Tribute to Mahesh Ladkat : महेश लडकत – दिलेला शब्द पाळणारा मित्र

एमपीसी न्यूज (संतोष रासकर) : अमिताभ बच्चन आणि महेश लडकत यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो 11 आक्टोबरला! राजकारणात प्रामाणिक असणे, शब्द दिला तर तो पाळणे, शिस्तीचे वागणे, निर्व्यसनी असणे, असे गुण पाहायला मिळणे म्हणजे दुर्मीळ योगायोग, पण असा योगायोग म्हणजे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक महेश लडकत. नुकतेच त्यांचे दीर्घकालीन आजाराने निधन झाले आणि अनेकांना महेश लडकत यांच्या मृत्यूमुळे आपण पोरके झालो, असे वाटू लागले, इतका जिव्हाळा त्यांनी अनेक मित्रांना दिला होता.

अशा स्वच्छ चारित्र्याच्या माणसाबरोबर आपली घनिष्ठ मैत्री होती किंबहुना मैत्रीपेक्षा आधिक काहीतरी होते ही गोष्टच मला मोठी अभिमानाची वाटत असायची. बोलण्याची पद्धत अगदी स्पष्टवक्ती तरी देखील समोरच्याला न दुखावता आपले स्पष्ट म्हणणे तो सांगायचा. तुम्ही त्यांच्या जवळ कोणतीही गोष्ट घेऊन जा तुमची बाजू ऐकून घेतली की त्या गोष्टीची दुसरी बाजू तो सांगणारच. अनेक मित्रांच्या यादीत तो त्यांचा सर्वात पहिला सल्लागार होता.

पतित पावन संघटनेपासून कामाला सुरूवात केलेला हा तळमळीचा कार्यकर्ता पुणे विद्यापीठाचा विद्यार्थी प्रतिनिधी बनतो आणि पुढे अनेक लोकांच्या शाळा-कॉलेजच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांचा मदतनीस होतो. नव्वदीच्या दशकात पुणे शहरात कोणत्याही कॉलेजमध्ये कोणत्याही मध्यस्थाला कसलेही पैसे न देता प्रवेश मिळवण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणजे महेश लडकत. त्याने ज्यांचे प्रवेश केले त्यांचे करियर आणि भविष्य पुढे घडले अशा हजारो लोकांची यादी बनेल, इतके काम त्याने कोणताही मोबदला न घेता सामाजिक जाणिवेतून केले.

महेशची आणि माझी ओळख खरे तर यानंतरच्या काळातली म्हणजे महेश लडकत पुणे शहर भाजयुमोचे सरचिटणीस झाले तेव्हा मी तेव्हाच्या शिवाजीनगर मतदारसंघात युवा मोर्चाचा सांस्कृतिक आघाडी प्रमुख होतो, युवा मोर्चाच्या पहिल्याच कार्यशाळेत महेश लडकत आणि माझी ओळख झाली आणि पुढे भेटीगाठी वाढल्या तसे तसे आमचे नाते घट्ट होत गेले.

वेगवेगळ्या क्षेत्राविषयी महेशचे ज्ञान आणि आवड प्रचंड होती. सुरवातीलाच आम्ही एकत्र जिल्हास्तरीय कब्बड्डी स्पर्धेचे आयोजन केले त्या काळात अशा प्रकारच्या भव्य आयोजनाचे नियोजन महेशच करू शकत होता. क्रीडा क्षेत्राविषयी विशेष आवड त्यांच्याकडे होती, संघटनात्मक काम करताना क्रिकेटपासून अनेक प्रकारच्या खेळाच्या स्पर्धांचे आयोजन नियोजन करणाऱ्या महेशभाऊने शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची संधी मिळताच पुणे महानगरपालिकेच्या शाळामध्ये क्रीडा निकेतन शाळांचा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला.

आज या शाळातून राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे उत्कृष्ठ खेळाडू निर्माण होण्यास मदत होते. इतका दूरगामी विचार करणारा महेश जरी भारतीय जनता पक्षाचा नेता होता तरी तो फक्त संघ परिवाराचा प्रिय नव्हता तर तो सर्वच राजकीय पक्षातील लोकांना आपला वाटत होता. शिक्षण मंडळाचा अध्यक्ष, पुणे मनपाचा नगरसेवक, शहर सुधारणा, नांव समितीचा अध्यक्ष, उद्यम विकास सहकारी बँकेचा अध्यक्ष या पदासोबत पक्ष संघटनेत राज्यस्तरावरील जबाबदारी लीलया सांभाळणाऱ्या महेशला मात्र राजकीय आणि जातीय समीकरणामुळे या पेक्षा आधिक संधी मिळायला हव्या होत्या. त्या मिळू शकल्या नाहीत.

महेशविषयी एक मोठा समज सर्वांचा आहे की, तो खासदार गिरीश बापट यांचा सर्वाधिक विश्वासू सहकारी होता. मला तो सर्वांचा गैरसमज आहे, असे वाटते, खरे तर प्रत्येकजण महेशवर 100% विश्वास ठेवत असे, फक्त फरक हा आहे की महेशवर फक्त विश्वास टाकून आपले काम करून घेण्यापेक्षा गिरीश बापट यांनी त्यांच्या क्षमतेला संधी दिली. याही पेक्षा मोठे म्हणजे महेश नेता होता पण मित्रांचा सख्खा मित्र होता.

महेश नवांगुळ, संदीप शेट्टी, शशांक इनामदार, सतीश नायर, दीपक मानकर, दिलीप परब, संजय पारीख, गुरुनाथ शेट्टी, अली दारूवाला, सुदर्शन शनवारे, किरण सोनार, शिरीष कुलकर्णी, विपुल घडशी अशी अनेक नावे त्यांच्या मित्रांच्या यादीत होती. ही मैत्री सगळ्या बंधनाच्या पलीकडे होती अगदी आठ-नऊ महिन्याच्या आजारपणात निरपेक्ष वृत्तीने महेशची सार्वकालिक सेवा करणारा उल्हास खाटपे आणि महेशचा मित्र परिवार म्हणजे महेशच्या आयुष्याची खरी पुंजी आहे.

राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आणि लोकप्रतिनिधी या सर्वार्थाने महेशने लोकांच्या शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक, सामाजिक अशा सर्व अडचणी सोडविण्यासाठी कोणतीही बंधने पाळली नाही. महेशला काम सांगणे म्हणजे ते काम झालेच, असे त्याच्याविषयी खासदार गिरीश बापट म्हणायचे ते अगदी खरे आहे. आज महेश गेल्यावरही त्याने केलेल्या कामामुळे तो अनेकांच्या किंबहुना पुढच्या पिढीच्या लक्षात राहील. अभिनयाच्या क्षेत्रातील महानायक अमिताभ बच्चन असतील तर पुण्याच्या सार्वजनिक जीवनाचा नायक नक्कीच महेश लडकत आहे.

(या लेखाचे लेखक संतोष रासकर हे सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे कार्यकारी संचालक आहेत. तसेच महेश लडकत यांचे ते जवळचे मित्र होते.)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.