Khed News : प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात व्हावे – महेश लांडगे

एमपीसी न्यूज – नवीन प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दर्जाचे लॉजिस्टिक विमानतळ खेड तालुक्यातच झाले पाहिजे, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष आणि आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

जागेच्या प्रश्नावरून कायम चर्चेत असलेल्या पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची मान्यता केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने रद्द केली. त्यामुळे आता नव्याने जागेचा शोध घेताना पिंपरी-चिंचवडलगतच्या खेड तालुक्यातच विमानतळ व्हावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संरक्षण मंत्रालयाने नवीन जागेला साईट क्लिअरन्स म्हणजे जागा परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अर्थात राज्य सरकारला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

तत्कालिन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड अंतिम केली होती. त्याला संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली होती. मात्र, आघाडी सरकार आल्यानंतर त्या जागेत बदल करण्यात आले. या नवीन बदलांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता. पण, संरक्षण मंत्रालयाने परवानगी नाकारली आहे.

पुणे जिल्ह्याच्या औद्योगिक पट्टयात आंतरराष्ट्रीय विमानतळ होणे गरजेचे आहे. गेल्या 10 वर्षांपासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित होता. राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने पुरंदर येथील जागेची निवड केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जागेत बदल केला. आता संरक्षण मंत्रालयाने ‘साईट किल्अरन्स’ नाकारला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा…
पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तळेगाव-चाकण-रांजणगाव येथील इंडस्ट्रिअल हब आणि पिंपरी-चिंचवडमधील रेसिडेन्सिअल कॉरिडॉरच्या दृष्टीने भविष्यातील 25 वर्षांचा विचार करता खेड तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ व्हावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. तसेच, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक निर्णय घेतील, अशी अपेक्षाही आमदार लांडगे यांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.