Mahindra O2W News : ‘महिंद्रा’तर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकणसह सात शहरात ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ सुरू

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत भारतात सर्वत्र ऑक्सिजनचा तीव्र तुडवडा निर्माण झाला आहे. पार्श्वभूमीवर महिंद्रा समूहाने ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ (ओटुडब्ल्यू) हा मोफत सेवा उपक्रम लॉंच केला आहे. हा उपक्रम ऑक्सिजन निर्माते आणि त्याची तीव्र गरज असलेली हॉस्पिटल्स व वैद्यकीय केंद्रांना जोडून ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यास मदत करेल.

महिंद्राचा ‘ओटुडब्ल्यू’ हा उपक्रम मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूरमधे 100 वाहनांसह लाँच करण्यात आला आहे. ही मोफत सेवा इतर शहरांमध्ये व प्रामुख्याने दिल्लीतील गंभीर तुडवडा लक्षात घेता तिथे सुरू करण्यासाठी नागरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरू आहे.

या उपक्रमाला गेल्या 48 तासांत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता थेट रुग्णाच्या घरी ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यापर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना विचाराधीन आहे.

‘ओटुडबल्यू’चे कामकाज महिंद्रा लॉजिस्टिक्स या महिंद्रा समूहाच्या कंपनीद्वारे हाताळले जाणार असून कंपनीने या प्रकल्पासाठी प्रशासन व स्थानिक सरकारी संघटनांशी करार केला आहे. वाहनांचा मोठा ताफा, सर्वसमावेशक आदेश आणि नियंत्रण केंद्र यांच्या मदतीने महिंद्रा लॉजिस्टिक्स जीवरक्षक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विनाअडथळा आणि अखंडित पुरवठा साखळी तयार करत आहे. या ऑक्सिजनची हॉस्पिटल व वैद्यकीय केंद्रांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक केली जाणार आहे.

या उपक्रमाविषयी महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा म्हणाले, ‘आम्ही आमचे स्त्रोत आणि क्षमतांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून या आव्हानाचा सामना करण्यासाठी बांधील आहोत. ऑक्सिजन ऑन व्हील्स स्थानिक प्रशासनाशी भागिदारी करून तातडीची गरज पूर्ण करण्यात मदत करत असल्यामुळे मौल्यवान जीवांचे रक्षण करता येते तसेच आरोग्य क्षेत्रावर असलेला ताणही कमी करता येतो.’

महिंद्रा समूह कोविड- 19 च्या लढाईत सातत्याने आघाडीवर राहून काम करत आहे. समूहाचे या क्षेत्रातील काम व्यापक असून त्यात सरकारच्या दिलासा कामांसाठी निधी उभारण्यापासून आयसीयू बेड्स पुरवणे, आपत्कालीन कॅब सेवा, विलगीकरण केंद्रे उभारणे, वंचित घटकांना आर्थिक पाठिंबा आणि धान्य पुरवणे अशा कामांपासून निर्मिती यंत्रणा, सुविधांची पुनर्चरना करून सध्या आवश्यक असलेले पीपीई, फेस शील्ड्स, फेस मास्क, एयरोसोल बॉक्सेसचे उत्पादन करण्यापर्यंतच्या विविध कामांचा समावेश आहे.

त्याशिवाय समूह ऑक्सिजन प्लांट्स आणि विलगीकरण केंद्रे उभारण्यासाठी सरकारबरोबर काम करत आहे. एम अँड एम तसेच कंपनीच्या भागिदारांचे प्लांट्स कोणत्याही औद्योगिक कामांसाठी ऑक्सिजनचा वापर करत नाही. टेक महिंद्राचे सहकार्य लाभलेल्या नर्सिंग अकॅडमीचे कर्मचारी आणि विद्यार्थी विविध हॉस्पिटल्समधे मदत करत आहेत. समूहाने लसीकरणावरही भर देण्याचे ठरवले असून सहकारी आणि त्यांच्या कुटुंबियांचे 100 टक्के लसीकरण केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.