Pimpri : ‘महामेट्रोच्या पिलरचे काम निकृष्ट; स्ट्रक्चरल ऑडीट करा’

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात पुणे महामेट्रोचे काम वेगात सुरू असून कासारवाडी येथे मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शहरात पुणे-मुंबई महामार्गावर बीआरटी मार्ग उखडून पिंपरीपर्यंत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यासाठी महामहामार्गावर ठिक-ठिकाणी खोदाई करण्यात आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. तर दुसरीकडे मेट्रोचे सुरू असलेले कामही अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून संबंधित ठेकेदार नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश निकम यांनी निदर्शनास आणून दिली आहे. कासारवाडी येथील पिलरमध्ये सिमेंट अर्धवटपणे भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असून एखादी दुर्घटना घडल्यास भाजपचे स्थानिक पदाधिकारी जबाबदार, असेही साने यांनी म्हटले आहे.

भाजपचे पदाधिकारी फक्त स्वतःला किती कामाचे ठेके मिळतील याकडेच लक्ष देत असून कामाच्या दर्जाकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे शहरातील आतापर्यत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडीट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करुन घेण्यात यावे. यामध्ये ठेकेदार दोषी आढळला तर त्वरीत त्याचे काम थाबंवून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.