Pimpri : राष्ट्रवादीकडून महापौरपदाची संधी हुकलेल्या अन् आता भाजपकडून महापौरपदासाठी अर्ज भरताच माई ढोरे यांनी राष्ट्रवादीवर झाडल्या दुगण्या

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदाची संधी हुकलेल्या माई ढोरे यांनी आज भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज भरताच ढोरे यांनी राष्ट्रवादीवर दुगण्या झाडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा शहरात पुनर्जन्म होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना सन 2005 मध्ये महापौरपद सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) वर्गातील महिलेसाठी राखीव झाले होते. त्यावेळी माई ढोरे महापौरपदासाठी इच्छुक होत्या. पण, त्यांची संधी हुकली. मंगला कदम यांना महापौरपद मिळाले होते. महापौरपदाची संधी हुकल्यामुळे राष्ट्रवादीने 2006 मध्ये माई ढोरे यांना स्थायी समितीचे सभापतीपद दिले होते.

फेब्रुवारी 2017 मध्ये राष्ट्रवादीची सत्ता जाऊन महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. भाजपची एकहाती सत्ता असल्याने माई ढोरे यांची महापौरपदी निवड निश्चित मानली जात आहे. महापौरपदासाठी अर्ज भरल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ढोरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  शहरात पुनर्जन्म घेण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, आम्ही राष्ट्रवादीचा पुनर्जन्म होऊ देणार नाही.

भाजप नियमावलीत काम करतो. शिस्तीचा पक्ष आहे. आम्हाला पक्षाची शिस्त आवडली आहे. भाजपची साखळी भक्कम आहे. ती कधीच तुटणार नाही. शेवटपर्यंत भाजपमध्येच राहणार आहोत. शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यावर आपला भर असणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.