BNR-HDR-TOP-Mobile

Pune : मानाचे पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात झाली आहे. त्यानंतर साधारण 20 मिनिटांच्या अंतराने मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आणि मानाचा पाचवा श्री केसरी वाडा गणपती मिरवणूक मार्गात मार्गस्थ झालेत.

यावेळी महापौर मुक्ता टिळक, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त के व्यंकटेशम आदी उपस्थित होते.

कसबा गणपतीनंतर मानाचा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती फिकट गुलाबी आणि पांढ-या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या पालखीतून टिळक पुतळा येथे दाखल झाला. त्यापाठोपाठ मनाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपतीचे आगमन झाले. झंडू, शेवंती, आणि तांबड्या रंगाच्या फुलांनी सजवलेल्या रथात गणपतीची मूर्ती ठेवण्यात आली. पिवळ्या झेंडू आणि पांढ-या शेवंतीत तांबड्या रंगाच्या फुलांच्या माळांनी सजवलेला रथ आणि दर्शनी भागातील गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक दिसत होती.

त्यानंतर दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भवदिव्य रथातून मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मिरवणुकीत दाखल झाला. भवदिव्य अशा शेषनागाच्या रथात स्वार झालेल्या तुळशीबाग गणपती नंतर मानाचा पाचवा श्री केसरी वाडा गणपती मिरवणुकीत दाखल झाला. केसरी वाडा गणपतीची पालखी उंच रथात ठेवण्यात आली होती.

यावेळी विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठी मानाच्या पाचही गणेश मंडळांनी पुढाकार घेत वेळेचे नियोजन केले. सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटांच्या अंतरांनी मानाचे पाचही गणपती मिरवणुकीत मार्गस्थ झाले. त्याचप्रमाणे वेळेच्या नियोजनासाठी बेलबाग चौकापासून मुख्य ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झालेत. यंदा एका पथकात ४० ढोल, १५ ताशे, १० ध्वजधारी आणि ३० जादा वादक असा ताफा असणार आहे.


मानाचा पहिला श्री कसबा गणपती

मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती


मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती

मानाचा पाचवा श्री केसरी वाडा गणपती

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3