Pimpri : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणातील फरार सराईत आरोपीस अटक

गुन्हे शाखा युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज – नगरसेवक दत्ता साने यांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी फरार असलेल्या सराईत आरोपीला मोटारसायकलसह अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने ही कारवाई केली.

जस्टिन रिचर्ड जेम्स उर्फ जस्टिन जॉन कॅनेडी (वय 27, रा. बोपोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी दिनेश पुकराज रेनवा, अक्षय प्रभाकर साबळे, आकाश गणेश पवार, देवेंद्र रामलाल बीडलानी, सॅमसन उर्फ सॅम सुलेमान अॅमेन्ट, मुकेश प्रल्हाद कांबळे या आरोपींना अटक केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता साने यांचे चिखली मधील साने चौक येथे जनसंपर्क कार्यालय आहे. 7 जून रोजी दुपारी सात जणांच्या टोळक्याने त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पूनम महाडिक यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा करीत आहे. आरोपी जस्टिन हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. पोलीस त्याच्या मागावर होते.

पोलीस नाईक मनोजकुमार कमले यांना माहिती मिळाली की, आरोपी जस्टिन दर दोन तीन दिवसांनी त्याच्या बोपोडी येथील घरी येत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊन रेल्वे लाईन जवळ वाढलेल्या झाडांमध्ये लपून बसला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपी जस्टिन याला 29 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जस्टिन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, चोरी, मारामारी अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी शिवाजी कांदे, बाळू कोकाटे, प्रमोद लांडे, मनोजकुमार कमले, अमित गायकवाड, मारुती जयभाये, अंजनराव सोडगीर, सचिन मोरे, विशाल भोईर यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.