Pre-Mansoon Prepration: पावसाळा तोंडावर, यंत्रणांमध्ये चांगला समन्वय ठेवा- मुख्यमंत्री

Maintain good coordination in the system in monsoon disasters says CM uddhav thackeray in pre-mansoon preparation review meeting

एमपीसी न्यूज- सध्या आपण कोविड-19 चा मुकाबला करीत असतानाच येणाऱ्या पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तींना देखील आपल्याला समर्थपणे तोंड द्यायचे आहे. त्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी एकमेकांत चांगले समन्वय ठेऊन काम करा तसेच रोगराई पसरणार नाही यासाठी आधीपासून नियोजन करा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, मुख्य सचिव अजोय मेहता, सर्व विभागीय आयुक्त, रेल्वे, नौदल, लष्कर, हवाई दल, तटरक्षक दल, हवामान विभागाचे तसेच मुंबई पालिका आयुक्त व इतर अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, हवामानाचा अंदाज सांगायला कुठल्याही भोलानाथाची गरज नाही, इतके आता तंत्रज्ञान विकसित झाले आहे. मात्र तरी देखील पाउस आपले अंदाज चुकवतोच. अचानक कमी दाबाचा पट्टा तयार होणे, त्यामुळे वादळ, जोरदार पाउस, ढगफुटी असे काहीही होऊ शकते. त्यामुळे सर्व विभागांनी हवामान विभागाच्या कायम संपर्कात राहावे व चांगला समन्वय ठेवावा.

ज्याप्रमाणे विमान वाहतुकीच्या वेळी हवामानाविषयी खात्री करून घेता येते. त्याप्रमाणे रेल्वेने देखील पुढील मार्गातील हवामानाचा अंदाज पाहून रेल्वे गाड्यांचे नियोजन करावे. गेल्या वर्षी महालक्ष्मी एक्स्प्रेस भर पावसात बदलापूरजवळ अडकली होती त्याचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला.

आपण आपत्तीत बचाव कार्य करणार आहोत. पण सध्या कोविड-19 परिस्थितीमुळे सावधानता बाळगावी लागणार आहे. यादृष्टीने आवश्यक ती संरक्षण साधने व किट्स, मास्क उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला पुराची पुनरावृत्ती नको

गेल्या वर्षीप्रमाणे सांगली-कोल्हापूरला यंदा पुराचा फटका बसू नये म्हणून धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे व अलमट्टी धरणातील पाण्याबाबत तेथील विभागाशी आत्तापासून समन्वय ठेवावा अशा सूचनाही त्यांनी केल्या

कोणत्याही परिस्थितीत खड्डे नकोत

मुंबईत २००५ च्या पुरानंतर आपण अधिक काळजीपूर्वक व सुविधांनिशी काम करू लागलो. नालेसफाई, त्यांचे खोलीकरण, वेळीच पाणी निचरा होणे हे महत्वाचे आहे. पंपिंग स्टेशन व्यवस्थित चालली पाहिजेत. पाण्याचा निचरा करणारे तेथील पाईप्स मोकळे आहेत का ते पाहायला पाहिजे. शहरी असो किंवा ग्रामीण भाग पण कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांवर खड्डे पडू न देणे आणि पडले तर तत्काळ बुजविणे महत्वाचे आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले. दुर्गम भागात पावसाळ्यात अन्न धान्य, औषधी पुरवठा व्यवस्थित झालेला आहे का, हे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

अंधेरी येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात कोविडसाठी विलगीकरण सुविधा केल्याने एनडीआरएफला पर्यायी जागा लगेच द्या, असे निर्देश त्यांनी दिले. स्थानिक पातळीवर माजी सैनिकांना सहभागी करून घेतल्यास भारतीय लष्कर आणि प्रशासनात चांगला समन्वय राहील असेही ते म्हणाले.

मेघदूत आणि उमंग मोबाईल एप

भारतीय हवामान विभागाचे उपमहासंचालक के एल होसाळीकर यांनी यावेळी सादरीकरण करून सांगितले की, राज्यात पाऊस सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त असेल. दि. १ ते २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस संपूर्ण महाराष्ट्रात कोसळण्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव पडणार नाही. ज्यामुळे गेल्या वर्षी उत्तरार्धात भरपूर पाउस झाला. तो इंडियन ओशन डायपोल देखील अनुकूल आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य तर विदर्भात सामान्यापेक्षा कमी पाउस होईल. सर्वसाधारणरित्या महाराष्ट्रात ११ जून रोजी पाऊस येईल आणि नेहमीपेक्षा जास्त रेंगाळून दि. ८ ऑक्टोबर रोजी त्याच्या परतीचा प्रवास सुरु होईल. गेल्यावर्षी महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ३२ टक्के पेक्षा जास्त पाउस झाला होता असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like