Pune : ‘केरळीय गणिता’मध्ये माधवांचे बहुमोल योगदान ; डॉ. सोलापूरकर यांचे प्रतिपादन

मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपटे बंधू स्मृती व्याख्यान

एमपीसी न्यूज  : ”भारतीय गणित शास्त्राला एक प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरा लाभली आहे. चौदाव्या शतकामध्ये केरळमध्ये माधवा हे महान गणिततज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे व संबंधित पुराव्यांमुळे आज आपल्याला गणितासारखा किचकट विषय सोप्या पद्धतीने समजू लागला आहे. गणित विषयामध्ये माधवांचे योगदान बहुमोल आहे,” असे प्रतिपादन सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे आयोजिलेल्या आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेच्या ३५ व्या पुष्पात डॉ. सोलापूरकर बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेत ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र र, गणिततज्ञ रवी कुलकर्णी, कार्यवाह संजय मालती कमलाकर यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘माधवा व केरळीय गणित’ या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.

डॉ. सोलापूरकर म्हणाले, “केरळीय पर्वामध्ये प्रामुख्याने सीमा, विकलन व संकलन या संकल्पनांचा अभ्यास झाला आहे. इ. स ४०० ते १२०० या अतिशय महत्वपूर्ण कालखंड आहे. या कालखंडामध्ये पंच सिद्धांत हस्तलिखिते, महाभास्करीय ब्रह्मस्फुट, सिद्धांत, गणिती सारसंग्रह, बीजगणित, लीलावती अश्या अनेक महत्वपूर्ण ग्रंथांची निर्मिती झाली आहे. या कालखंडानंतर केरळीय गणित पर्वाचा झाला व यात माधवा, परमेश्वर, नीलकंठ व ज्येष्ठदेव यांसारखे गणित तज्ज्ञ होऊन गेले.”

रवी कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत गणितातील सूत्रे सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निश्चय म्हात्रे यांनी केले. आभार विनय र र यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.