BNR-HDR-TOP-Mobile

Daund: कुरकुंभच्या अल्कली अमाईन्स केमिकल कंपनीला भीषण आग

भीतीने कुरकुंभ गाव मध्यरात्री रिकामं, पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहनांच्या रांगा

एमपीसी न्यूज – दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसीत अल्कली अमाईन्स या केमिकल कंपनीला आज (बुधवारी) रात्री भीषण आग लागली आहे.  पुणे -सोलापूर महामार्गापासून ही कंपनी अगदी जवळ असल्याने पोलिसांनी महामार्ग बंद केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले असून मध्यरात्री कुरकुंभ गाव रिकामे करण्यात आल्याचे समजते. मध्यरात्री आग नियंत्रणात आली असून या दुर्घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे अद्याप वृत्त नाही.

अल्कली अमाईन्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर रसायनांचा साठा होता. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली. कंपनीत आग लागली तेव्हा किती कामगार कामावर होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. तथापि आग आटोक्यात आली असून, कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

कंपनीच्या आवारात रसायनांचे बॅरल असल्याने स्फोट होऊ लागले. त्यामुळे आकाशात आगीचे उंचच उंच लोळ उठत होते. सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावरून आगीचे लोळ दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी परिसराची पूर्ण नाकेबंदी केली होती. स्फोट होत असल्याने अग्निशमन दलाचे बंब आगीपर्यंत पोहोचणे अवघड होत होते. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न रात्री बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. महामार्गावर दोन्ही बाजूंना दहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

आगीची तीव्रता मोठी असल्याने पोलिसांनी आणि ग्रामस्थांनी पाटसजवळ सोलापूर महामार्ग बंद केला होता. सुमारे एक किलोमीटरपर्यंत आगीचे लोळ येत असल्याने कंपनीत कामगार होते किंवा नाही याबाबत पोलिसांनाही माहिती नव्हती. दरम्यान, भीतीने गाव सोडून ग्रामस्थांनी पळ काढल्याने गाव ओस पडल्याचे पहायला मिळत होते.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3