Pune : पुण्यात विविधरंगी तीळगुळाची दत्तमंदिराला सजावट

विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज – विविधरंगी हलव्याचे प्रकार, गुळाच्या ढेपा, तीळाचे लाडू, वडी, गुळपोळी यांची आरास दगडूशेठ दत्तमंदिराला करण्यात आली आहे.

तीळगुळाचा तन्मणी, लफ्फा, कंबरपट्टा, मुकुट असे विविध दागिने घातलेल्या दत्तमहाराजांची विलोभनीय मूर्ती पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली. मकरसंक्रांतीनिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमहाराजांना १२५ किलो गूळ, ५१ किलो तीळगूळ आणि हलव्याच्या दागिन्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.

यावेळी मुस्लीम राष्ट्रीय मंचचे राष्ट्रीय मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी दत्तमहाराजांची आरती केली. तसेच त्यांनी दत्तमंदिरातील इतर उपक्रम आणि अनसूया कक्षाविषयी माहिती घेतली. मुस्लीम राष्ट्रीय मंचचे संयोजक विराग पाचपोर, लतीफ मकदूम, इरफान पीरजादे, मुस्लीम राष्ट्रीय मंचचे पुणे शहरप्रमुख अली दारुवाला, ट्रस्टचे अध्यक्ष शिरीष मोहिते, कार्यकारी विश्वस्त बी.एम. गायकवाड, खजिनदार अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, विश्वस्त युवराज गाडवे यांसह विश्वस्त पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मकरसंक्रातीनिमित्त १२५ किलो गूळ, ५१ किलो तीळगूळ असा नैवेद्य दाखविण्यात आला. मकरसंक्रांतीनिमित्त दाखविलेला तिळगूळ भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे. गुरुवार, दि. १७ जानेवारी रात्रीपर्यंत ही आरास भाविकांना पाहण्याकरीता खुली राहणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.