Pimpri : ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ म्हणत संक्रात साजरी

शहर-परिसरात पारंपरिकरित्या सण साजरा, मंदिरात भाविकांची गर्दी,

एमपीसी न्यूज – आपल्या जीवनातील गोडवा टिकवून ठेवणारा आणि दररोजची धावपळ, ताणतणाव बाजूला ठेवून ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण मंगळवारी शहर-परिसरात पारंपरिकरित्या साजरा करण्यात आला. यादिवशी सूर्याचे मकर राशीत संक्रमण होत असल्याने हिंदू संस्कृतीनुसार पारंपरिक पद्धतीने सर्वांनी संक्रांत साजरी केली.

सकाळपासूनच गल्लोगल्ली तिळगूळ देण्यासाठी लहानग्यांची धावपळ सुरू झाली होती. सायंकाळी संक्रांतीच्या सणाच्या आनंदाला उधाण आले होते. मकर संक्रांत म्हणजे सुवासिनींचे वाण, तिळगुळाचे फक्कड लाडू, काटेरी रंगीबेरंगी हलवा आणि गोडधोड जेवणाचा बेत अशा वातावरणात सर्वत्र चैतन्याचे वातावरण पसरले होते. संक्रांतीच्या आदल्या दिवशी गुरूवारी भोगी उत्साहात साजरी करण्यात आली. तीळ लावलेली भाकरी, विविध भाज्यांच्या मिश्रणाची भाजी, चटण्या, दही असा जेवणाचा बेत घरोघरी रंगला होता.

सकाळपासून घरोघरी संक्रांत सणाची लगबग सुरू झाली होती. सायंकाळी तिळगूळ वाटण्यासाठी लोक घराबाहेर पडले. देवदर्शनानंतर ‘तीळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणत एकमेकांना संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. घरोघरी सुवासिनींच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला बहर आला होता. दहा दिवसांत जन्मलेल्या बालकांना हलव्यांचे दागिने घालून ‘बोरन्हान’ केले गेले तर, नवविवाहीत मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व असल्याने घरोघरी नवविवाहितांच्या आनंदाला उधाण आले होते. संक्रांतीनिमित्त शहर परिसरात असणा-या मंदिरातून भाविकांची गर्दी दिसून आली.

साहित्यांनी सजल्या बाजारपेठा
संक्रांतीच्या आधीच बाजारात ठिकठिकाणी तीळगूळ, तीळगुळासाठी प्लॅस्टिकचे लहान-मोठे डबे आणि वाणाच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या होत्या. बाजारपेठेत पांढऱ्या साध्या तिळगुळासह रंगबिरंगी तिळगूळ, काटेरी हलवा, रेवडी, चिक्की, तिळाचे लाडू अशा साहित्यांनी भरलेल्या स्टॉलवर खरेदीसाठी गर्दी होती.

अनेकांच्या सोशल शुभेच्छा!
बदलत्या काळानुसार तरुणांनी मोठ्या प्रमाणात सोशल साईटच्या मदतीने शुभेच्छांची देवाणघेवाण सुरु केली आहे. आज शुक्रवारी मकर संक्रांतीचा मुख्य दिवस असला तरी गेल्या दोन दिवसांपासून व्हॉटस अॅप, फेसबुक, ट्विटर व मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून नातलग व मित्रपरिवारावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत असल्याचे दिसून आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.