Junnar : गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित करा; पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांचे आवाहन

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जुन्नरमध्ये सर्वधर्मीय बैठक

एमपीसी न्यूज – गणपती उत्सव हा आनंदाचा उत्सव, यामध्ये कोणतेही विघ्न येणार नाही, याची प्रत्येक नागरिक, मंडळ आणि प्रशासनाने काळजी घ्यायला हवी. जी गणेशोत्सव मंडळे डॉल्बी लावतील, त्या मंडळांना पुढच्या वर्षी परवानगी देण्यात येणार नाही. विद्यार्थी, लहान मुले, वृद्ध नागरिक घरात असतात,  डॉल्बीच्या आवाजामुळे त्यांना त्रास होतो. मागील काही वर्षात डॉल्बीच्या आवाजामुळे भिंती पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव करावा,  असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे. तसेच प्रशासनासह गणेश मंडळांनी जर सीसीटीव्ही कॅमेरे लावले तर गणेशोत्सव सुरक्षित पार पाडण्यासाठी मदत होईल, असेही पाटील म्हणाले.

जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने जुन्नर पंचायत समिती सभागृहात रविवारी (दि. 2) सायंकाळी झालेल्या बैठकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, नायब तहसीलदार वळवी, जुन्नर नगरपालिका नगराध्यक्ष शाम पांडे, उपनागराध्य अलकका फुलपगार, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे, जुन्नर मधील सर्व गणपती उत्सव मंडळातील कार्यकर्ते, शांतता समिती सदस्य, हिंदू – मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

संदीप पाटील म्हणाले, “नगरपालिका ट्रॅफिक वार्डनची जबाबदारी घेऊ शकते. वॉर्डनला आम्ही गणवेश देऊ नगरपालिकेने त्यांना मानधन द्यावे, यामुळे वाहतुकीचा प्रश्न मिटू शकतो. गणपती मंडळामध्ये महिलांचा समावेश करा. सर्व गणपती मंडळांना वीज पुरवठा सुरळीतपणे होण्यासाठी महावितरणने प्रयत्नशील राहावे. जुन्नर करांनो शिवनेरी आमच्या आठवणीत राहिला पाहिजे, असा चांगला गणेशोत्सव करून दाखवा, असेही पाटील यांनी सर्व गणेश मंडळांना आवाहन केले.

पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे म्हणाले, “यावर्षीचा गणपती उत्सव डॉल्बी मुक्त, प्लास्टिक मुक्त करायचा आहे. ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घावी. मिरवणुकीत वेळेचे पालन करण्यासाठी पोलिसांकडून पाच शांतिदूत नेमण्यात येणार आहेत. हे पाच शांतिदूत सर्व मंडळांवर वेळेची अंमलबजावणी करणार आहेत.”

नगरसेवक भाऊ कुंभार म्हणाले, “गणेशोत्सव कालावधीत कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत आम्ही ग्वाही देतो. परंतु मिरवणुकीच्या वेळी काही गणपती मंडळे वेळेचे बंधन पाळत नाहीत. त्यामुळे मिरवणुकीस उशीर होतो आणि सर्व मंडळांना जुन्नर नगरपालिका चौकात वाद्य वाजविण्यास मिळत नाहीत. यावरून काही वेळेला वाद होतो. त्यासाठी सर्व मंडळांनी काटेकोर वेळेचे बंधन पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न करावेत.

नगरसेवक फिरोज पठाण म्हणाले, “जुन्नर मध्ये आम्ही सर्व सण-उत्सव हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरा करत आहोत. यावर्षी देखील आम्ही गणेशोत्सव शांततेत पार पडणार आहोत. निवडक लोकांच्या दुबळ्या मानसिकतेमुळे काही अडचणी निर्माण होतात. सर्व पुढा-यांचे किंवा मान्यवरांचे सत्कार नगरपालिकेसमोरच करावेत. ही जुन्नरची फार जुनी परंपरा असून ती मोडू नये, असेही पठाण म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.