Maval News : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 11 लाखांचा निधी मिळवा : आमदार सुनील शेळके

आमदार सुनील शेळके यांनी केली 'माझं गाव, माझा स्वाभिमान' अभियानाची घोषणा

एमपीसी न्यूज : गावकी-भावकी, गटा-तटाचे वाद निवडणुकीच्या काळात सुरु होण्याचे प्रकार आजही घडत आहेत. हे प्रकार घडू नयेत यासाठी मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन आमदार सुनील शेळके यांनी केले आहे. निवडणुका बिनविरोध होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी ‘माझं गाव, माझा स्वाभिमान’ अभियान हाती घेतले आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 11 लाखांचा निधी मिळवा, अशी घोषणाही त्यांनी केली. 

गावाच्या विकासाला प्राधान्य देत निवडणुका बिनविरोध होणे गरजेचे आहे. विकासाचे नवीन मॉडेल गावागावात तयार करण्यासाठी नवीन योजना देखील राबवता येतील. त्यासाठी गावक-यांनी एकत्र येऊन विकास करावा आणि गावासाठी निधी घेऊन जावा, असे आवाहन देखील आमदार शेळके यांनी केले आहे.

मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या काळात मतदारयाद्यांमध्ये नाव लावण्यापासून संघर्षाला सुरुवात होते. अनेकदा वाद होतात. काहीजण नाव नोंदणीसाठी दबावतंत्राचा वापर करतात. त्यावर नंतरच्या काळात कारवाई देखील होते. हे प्रकार टाळण्यासाठी ‘माझं गाव माझा स्वाभिमान’ हे अभियान राबवले जात असल्याची आमदार शेळके यांनी घोषणा केली.

गावातील ज्येष्ठ, प्रतिष्ठित, जाणकार व्यक्तींनी एकत्र यावं. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला त्यात हस्तक्षेप करू देऊ नये. त्यातून आपापसातले वाद, संघर्ष टाळून विकासाभिमुख निवडणुका होतील याकडे लक्ष द्यावे. पराभव झाला तर तो जिव्हारी लावून विकासकामात खोडा न घालता गावाच्या विकासाला प्राधान्य द्यायला हवे. निवडणुकीत प्रत्येक वेळी आश्वासने दिली जातात. त्यातून लोकांना आशेवर ठेवलं जातं. मात्र तोही पॅटर्न बदलून आता प्रत्यक्ष काम करून निवडणुकांना सामोरं जाऊ, अशी साद आमदार शेळके यांनी दिली आहे.

गावातील नागरिकांनी एकत्र येऊन ठरवावं आणि विकास करावा, विकास करणा-या गावांना निधी देण्याची जबाबदारी माझी. गाव, वाड्यावस्त्यांवरील निवडणुकीत पक्ष बघू नये. गाव पातळीवर निर्णय घ्यावा. काहीजण ग्रामपंचायतीच्या निवडणुकींना अस्तित्वाची निवडणूक असाही रंग देतात. ते करू नये. आम्हाला निवडणूक बिनविरोध करायची नाही, अशा मताचे देखील काहीजण असतात तिथे ग्रामस्थच संबंधित लोकांना त्यांची जागा दाखवतील, असेही आमदार शेळके म्हणाले.

आमदार शेळके पुढे म्हणाले, “आम्ही विकासकामांची स्पर्धा करतोय. त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने सहभागी व्हावे. निवडणूक बिनविरोध झाली तर त्या ग्रामपंचायतीला अकरा लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर गाव तंटामुक्त करा, एक लाख रुपयांचा निधी घेऊन जा. गाव हागणदारी मुक्त करा, एक लाख रुपयांचा निधी घेऊन जा. गावात स्वच्छ चांगले पाणी पुरवठा करा, त्यासाठी एक लाख रुपये निधी आहे. शासनाचे सर्व कर भरणा-या गावांना एक लाखांचे पारितोषिक आहे. गावातल्या शाळा डिजिटल,आयएसओ केल्यास त्यासाठी देखील एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन यासाठी देखील बक्षीस आहे. असे दहा विविध विभाग करुन एक एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

‘गावातील एकोपा, एकजूट, लोकसहभाग आणि ग्रामविकासासाठी बिनविरोध निवडणूका होणे गरजेचे आहे, गावातील सुज्ञ नागरिक व युवकांनी बिनविरोध निवडणूकीसाठी नक्की प्रयत्न करावा. स्थानिकांच्या इच्छाशक्तितुन गावचा कायापालट करणा-या गावांना प्रोत्साहन देण्यासाठी हा बक्षिसांचा निधी दिला जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होण्यासाठी अनेक ग्रामपंचायती पुढे येतील’, असा विश्वास शेळके यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.