Pune : ‘त्या’ला इंजिनिअर बनवाच; नीलम गोऱ्हे यांनी दिला बोडेकर कुटुंबाला दीड लाखांचा धनादेश 

एमपीसी न्यूज : पुण्याच्या दांडेकर पूल येथील मुठा कालव्याला भगदाड पडल्यामुळे शहराला काल पुराचे स्वरुप आले होते. कालव्याच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील २०० हून अधिक कुटुंबाचे संसार या पाण्यात वाहून गेल्याने येथील नागरिक बेघर झाले आहेत. अचानक आलेल्या पाण्यात सुरेश बोडेकर यांच्या घरातील अनेक गोष्टी वाहून गेल्या आहेत. त्यातच त्यांनी साठवलेले पैसेही वाहून गेले. मुलाच्या जेईईच्या क्लाससाठी बोडेकर यांनी ही रक्कम ठेवली होती. 

मार्केटयार्ड येथे हमाली करणारे सुरेश बोडेकर यांनी मित्राकडून आणलेली दीड लाख रुपयांची रक्कम वाहून गेलीे. क्लासच्या फीचे सगळे पैसे वाहून गेल्याने आता क्लासला प्रवेश कसा घेणार असा यक्षप्रश्न बोडेकर कुटुंबीयांसमोर उभा राहिला होता. मात्र, या कुटुंबाची व्यथा जाणून घेतल्यानंतर शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी बोडेकर कुटुंबीयांना दीड लाखांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

ही बातमी समजल्यानंतर शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुलाच्या शिक्षणाला त्वरित मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आम्ही ही मदत केल्याचे आमदार नीलम गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, “मी घरकाम करते , माझे पती हमाली करतात. आम्हाला 4 मुलं आहेत. त्यातील 2 अपंग , आठरविश्व दारिद्र्य पाचवीला पुंजलेलं. तरी मुलाला इंजिनिअर करायचंच ठरवलं होतं . मुलाच्या जेईईच्या क्लासला भरण्यासाठी माझ्या पतीने मित्राकडून दीड लाख रुपये आणले होते . पण सकाळी पाणी आलं अन घर, पैशासाहित आमचे स्वप्न सुद्धा वाहून गेले. अस पोटतिडकीने सांगत मुलाची आई शेवंता बोडेकर यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. मात्र आता या मदतीने आपला मुलगा इंजिनिअर होणार असल्याचे पाहून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळं सांगून जात होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.