Pimpri News : पिंपरी, चिंचवड रेल्वे स्थानकाचा ‘मेकओव्हर’!

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचे मेकओव्हर करावा. दोन्ही स्थानकांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांकडे केली होती. त्याची दखल घेत रेल्वेने पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही रेल्वे स्थानकांवर विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबत रेल्वेच्या पुणे कार्यालयाने आमदार जगताप यांना पत्र पाठवून कळवले आहे.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी 3 डिसेंबर 2021 रोजी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवून पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्याची मागणी केली होती. त्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड हे अतिशय वेगाने विकसित होणारे शहर आहे. पुण्याला लागून असलेल्या या शहराच्या लोकसंख्येने 25 लाखांचा टप्पा पार केला आहे. या शहरात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यासाठी या प्रवाशांना पुणे रेल्वे जंक्शन येथे जावे लागते. परंतु, पुणे रेल्वे जंक्शन अपुरे पडत आहे. रेल्वे वाहतुकीचे वाढते प्रमाण टिकवण्यासाठी पर्यायी जंक्शन विकसित करणे काळाची गरज आहे. त्याचा विचार करून पुणे-मुंबई रेल्वेलाईनला लागून असलेल्या पिंपरी येथील डेअरी फार्मच्या सुमारे 50 ते 60 एकर वापराविना पडून असलेल्या जागेवर नवीन अत्याधुनिक रेल्वे जंक्शन विकसित करण्यात यावे. त्याचप्रमाणे पिंपरी आणि चिंचवड या दोन रेल्वे स्थानकांचा मेकओव्हर करण्यात यावा. या दोन्ही रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली होती.”

आमदार जगताप यांच्या मागणीची दखल घेत रेल्वेने गेल्या तीन महिन्यांत पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही रेल्वे स्थानकांचे सुशोभिकरण आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे मंडल विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांना 24 मार्च 2022 रोजी पत्र पाठवून कळवले आहे. पिंपरी रेल्वे स्थानकांत 25 केडब्ल्यूपी क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यात आले आहे. तसेच 30 केडब्ल्यूपी क्षमतेचे आणखी एक सोलर पॅनल लवकरच बसवले जाणार आहे. स्थानकात प्रवाशांना ये-जा सुलभपणे करता यावे यासाठी एक एक्सेलेटर आणि शौचालय उपलब्ध केले आहे. स्थानकांतील आसन व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. तसेच निसर्गरम्य चित्रांच्या थीमवर आधारित पेटिंगद्वारे स्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे.

चिंचवड रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व 2 चे 90 मीटरपर्यंत, तर प्लॅटफॉर्म क्रमांक 3 व 4 चे 65 मीटरपर्यंत विस्तार करण्यात आले आहे. जुने निकृष्ट दर्जाचे पादचारी पूल बदलून 6 मीटर रुंदीचे नवीन पूल उभारण्यात आले आहे. सर्व प्लॅटफॉर्म चांगल्या दर्जाचे बनवण्यात आले आहेत. स्थानकांत पाणी ऑटोमेशन प्रणाली लागू करण्यात आली आहे. रस्त्याची सुधारणा करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी रेस्टॉरंट ऑन व्हिल उपलब्ध करून देण्यात आले आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूला नवीन प्रवेशद्वार उभारण्यात आल्याचे रेल्वेने पत्राद्वारे कळवले आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.