Malavali : लोहगडावर महाशिवरात्र उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- लोहगडावरील त्र्यंबक महादेव मंदिरात दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 21) महाशिवरात्र उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

लोहगड महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला लोहगड गावातील शिवस्मारक परिसरात भव्य दीपोत्सव करण्यात आला. त्यामुळे शेकडो पणत्यांनी परिसर उजळून निघाला होता. फुलांनी शिवस्मारकाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. याप्रसंगी गड किल्ले सेवा समितीचे निलेश गावडे यांनी मार्गदर्शन केले.

महाशिवरात्रीला सकाळी त्र्यंबक महादेव मंदिरात अभिषेक करण्यात आला. लोहगड गावातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. शालेय मुलांचे लेझीम पथक, ढोल पथकाचे खेळ यामुळे पालखी सोहळ्यास भव्यता लाभली होती. माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे हस्ते शिवस्मारकावर पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, अलकाताई धानिवले, रायगड मंडळाचे कार्यवाह सुधीर थोरात, अमितकुमार बॅनर्जी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संदीप जाधव, प्रकाशराव मीठभाकरे, नगरसेवक शीतल शिंदे, गणेशभाऊ धानिवले, नागेश मरगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

लोहगड किल्ल्यावर इतिहास अभ्यासक ओंकार वर्तले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी दुर्ग संवर्धन करताना कोणकोणत्या तांत्रिक बाबींचा विचार केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच लोहगड किल्ल्याची ऐतिहासिक व भौगोलिक माहिती दिली. किल्ल्याची सजावट बजरंग दल मावळ व मंदिर सजावट निसर्गप्रेमी संघटना देहू यांचे वतीने करण्यात आली होती. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाचे नियोजन अध्यक्ष विश्वास दौंडकर, सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, चेतन जोशी, अमोल गोरे, सचिन निंबाळकर, संदीप गाडे, गणेश उंडे, अजय मयेकर, संदीप भालेकर, अमोल मोरे, सोमनाथ मसूडगे, महेंद्र बैकर, सोमनाथ बैकर, गौरव गरवड आदी कार्यकर्त्यांनी केले होते. लोहगड महाशिवरात्र उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी दरवर्षी ग्रामस्थ, विविध संघटना व शिवभक्त प्रयत्नशील असल्याची माहिती लोहगड विसापूर विकास मंचाचे संस्थापक व समन्वयक सचिन टेकवडे यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A2
You might also like