Malavali : मावळ प्रांतातील लेण्या व गड किल्ल्यांची युनेस्कोमध्ये सामूहिक नोंदीकरिता प्रयत्न करणार – राजेंद्र यादव

एमपीसी न्यूज- इतिहासाची साक्ष देणार्‍या अनेक पुरातन लेण्या व गड किल्ले मावळ परिसरात आहेत. या लेण्या व गड किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामूहिक नोंद करण्याकरिता प्रयत्न करु असे आश्वासन भारतीय पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ अधीक्षक डाॅ. राजेंद्रा यादव यांनी दिले. महाराष्ट्रातील भारतीय पुरातन वास्तु लेण्या व गड किल्ले याची माहिती इतिहासप्रेमी व नागरिकांना व्हावी याकरिता संपर्क बालग्राम भाजे येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

भारतीय पुरातन वास्तूंची तसेच लेण्या व गडकिल्ल्यांवरील सखोल माहिती युवा पिढीला मिळावी, महाराष्ट्र व मावळ तालुक्यातील कोरीव लेण्या व किल्ल्याविषयी जनजागृती व्हावी, तसेच लेण्याचा इतिहास व त्या बनविण्यामागची संकल्पना याची माहिती इतिहासप्रेमींना व्हावी याकरिता संपर्क बालग्राम संस्था भाजे येथे संपर्क संस्थेचे संस्थापक अमितकुमार बनर्जी यांनी पुरातन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्व विभाग डेक्कन पुणे यांच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते .

या कार्यशाळेत इतिहास संशोधक डॉ सुषमा देव यांनी सह्याद्री पुरातत्व शास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. पश्चिम महाराष्ट्रातील लेणी स्थापत्य याविषयावर डॉ. श्रीकांत गणवीर यांनी तर लेण्यामधील शिल्प व चित्रकला याविषयावर डॉ. श्रीकांत प्रधान यांनी मार्गदर्शन केले. लेण्यामधील शिलालेख यावर डॉ अभिजित दांडेकर यांनी मार्गदर्शन केले. लेण्या आणि दुर्ग यावर डॉ. सचिन जोशी यांनी विविध चित्रफिती द्वारे माहिती दिली. यानंतर डॉ. शंतनू वैद्य व डॉ. गोपाळ जोगे यांनी सहभागी इतिहास प्रेमीना भाजे लेणीवर नेऊन लेण्याची सखोल माहिती दिली.

कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्रमोद बोर्‍हाडे यांनी मावळ तालुक्यातील गडकिल्ल्यांच्या संदर्भात अधिक माहिती देत उपस्थित मान्यवर व सहभागी इतिहास प्रेमींचे आभार मानले. कार्यशाळेची प्रस्तावना अमितकुमार बँनर्जी यांनी तर सूत्रसंचालन प्रदीप वाडेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.