Pune Crime News : कोकण ट्रिपसाठी आईचा पैसे देण्यास नकार, संतापलेल्या मुलाने केले कोयत्याने सपासप वार

एमपीसी न्यूज – पुण्यातील येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्रांसोबत कोकणात फिरायला जाण्यासाठी आईने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने आईवरच कोयत्याने सपासप वार केले. पुण्यातील वडगावशेरी परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी संबंधित मुलावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ईश्वर प्रकाश गलांडे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आई नंदा प्रकाश गलांडे (वय 66) यांनी फिर्याद दिली आहे.

Vatsavitri Pournima 2022 : वडाचे झाड लावून घोराडेश्वर डोंगरावर वटसावित्री पोर्णिमा साजरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वरला कोकणात फिरण्यासाठी जायचे होते. त्यासाठी त्याने आईकडे पैशाची मागणी केली होती. मात्र आईने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संतापलेल्या ईश्वरने रागाच्या भरात आईला शिवीगाळ केली आणि घरात ठेवलेल्या लोखंडी कोयत्याने आईचा डोक्यावर वार केले. नंतर आईला त्याच अवस्थेत सोडून तो पळून गेला.

दरम्यान गंभीर जखमी झालेल्या आनंदा यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कर्पे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.