Bhosari : चिठ्ठी लिहून पत्नीचा खून अन पतीची आत्महत्या; एकाच वेळी आई-वडिलांच्या जाण्याने सात वर्षीय चिमुकलीचा टाहो

एमपीसी न्यूज – दोन वर्षांपासूनची बेरोजगारी, त्यातून आलेले आर्थिक संकट आणि कर्जदारांकडून पैशांसाठी होणारी मागणी याला कंटाळून एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वतःच्या आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. पती-पत्नीने एकत्र जीवनयात्रा संपवली असून यामुळे त्यांच्या सात वर्षीय चिमुकलीचा जगण्याचा आधार हरपला आहे. आई-वडिलांच्या एकाच वेळी जाण्याने चिमुकली धाय मोकलून रडत आहे.

प्रियंका निलेश देशमुख (वय 28, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर निलेश ए. देशमुख (वय 32) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश याचे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील आहे. त्याचे कुटुंब कामाच्या शोधात मध्य प्रदेश मधील इंदोर शहरात स्थलांतरित झाले. तिथे निलेश याची यांच्या नात्यातील प्रियंका यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, त्यांनी मागील दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला.

सात वर्षांपूर्वी त्यांच्या संसाराच्या वेलीवर एक कळी उमलली. निलेश आणि प्रियंका आपल्या चिमुकल्या ‘स्वरा’सह पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आले. निलेश भोसरी येथील लांडेवाडी मधील एका कंपनीत काम करत होता. तर प्रियंका एका खाजगी कंपनीत बॅक आफिसला काम करीत होत्या. सहा महिन्यांपूर्वी निलेश, प्रियंका आणि स्वरा हे कुटुंब भोसरी मधील शास्त्री चौकात राहायला आले होते.

सोमवारी (दि. 13) प्रियंका यांनी स्वराला आपल्या मैत्रिणीकडे पाठवले होते. रात्री नऊ वाजले तरी प्रियंका या स्वराला नेण्यासाठी आल्या नाहीत. त्यामुळे मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. मात्र, प्रियंकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे सोमवारी रात्री मैत्रिणीने प्रियंकाच्या मुलीला आपल्या घरी ठेवून घेतले.

मंगळवारी (दि. 14) सकाळी पुन्हा मैत्रिणीने प्रियंकाला फोन केला. परंतु, तरीही प्रियंकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मैत्रिणीचे पती आणि स्वरा प्रियंकाच्या भोसरी येथील घरी पोहोचले. घराचा दरवाजा ठोठावला. पण आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. काही वेळ दरवाजा ठोठावल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता प्रियंका निपचित पडलेल्या आणि निलेश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आत्महत्येपूर्वी निलेश याने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. हिंदी भाषेत लिहिलेल्या चिठ्ठीत प्रियंका यांची आई वारंवार पैशांसाठी तगादा लावत असल्याचे सांगितले आहे. ‘बार बार पैसा मांग रहे हो, अब लेलो पैसा’ असे ही म्हटले आहे. घराच्या भाड्याबाबत देखील चिठ्ठीत लिहिले असून ‘डिपॉझिट मधून भाडे कापून घ्यावे’ असे चिठ्ठीत म्हटले आहे. निलेश यांच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. तिला उद्देशून चिठ्ठीत म्हटले आहे की, ‘माँ, तुम्हारी बहु को लेकर तुम्हारे पास आ रहा हूँ’

पोलिसांनी दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अमरावती आणि इंदोर येथून येणा-या दोघांच्या नातेवाईकांनी आपण येईपर्यंत त्यांची उत्तरीय तपासणी करू नये, असा आग्रह धरल्याने नातेवाईक आल्यानंतर दोघांची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर, खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.