Pune : लग्न 15 दिवसांवर असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यातील नवले पुलाजवळ डंपर खाली येऊन दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आज (बुधवारी) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या तरुणाचे 15 दिवसानंतर लग्न होणार होते.  

विराज प्रताप निकम ( वय २९, रा. मानव मंदिर सोसायटी धनकवडी, पुणे), असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र देखील या अपघातात गंभीर जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, मयत विराज हा मित्र प्रितेश सोबत नऱ्हे येथील नवले पुलाजवळील सेवा रस्त्यावरून ऍक्टिवा गाडीवरून जात असताना डंपरच्या चाकाखाली येऊन गेला. गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर मित्र प्रितेश प्रवीण शहा (वय २९) जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

१९ मार्चला विराजचे लग्न होते. मित्रासोबतचे काम झाल्यानंतर तो आज कुटुंबीयांसोबत केळवणासाठी नातेवाइकांकडे जाणार होता. त्यामुळे घरातही सगळे त्याची वाट बघत होते. मात्र, तो प्रत्यक्ष जाण्यापूर्वीच त्याच्या मृत्यूची खबर पोचल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. लग्नाची तयारी पूर्ण झाली असताना प्रत्यक्ष नवरदेवाचाच करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अपघात घडल्यानंतर डंपर जागेवरच सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. रात्री उशिरापर्यंत सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.