Bhosari : प्रियकराकडून प्रेयसीचा खून; प्रियकर पोलिसांच्या ताब्यात

Man murders his lover in Kasarwadi after she refused to marry.

एमपीसी न्यूज – पतीपासून दुरावलेल्या महिलेचे एका तरुणाशी सूत जुळले. त्यातून ते दोघे एकत्र राहू लागले. तरुणाने महिलेकडे लग्नासाठी आग्रह केला. मात्र महिला विवाहास तयार होत नव्हती. त्यामुळे प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने गळा आवळून तिचा खून केला.

ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता कासारवाडी येथे घडली. याप्रकरणी प्रियकर महेश मल्हारी खंडागळे (वय 28, रा. भीमराव जवळकर चाळ, कासारवाडी. मूळ रा. एकुंडी, ता. उमरगा, जि. उस्मानाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत मयत महिलेची आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत ही तिच्या पतीपासून विभक्त राहत होती. दरम्यान आरोपी महेश आणि मयत महिला यांचे प्रेमसंबंध जुळले. ते दोघे लग्न करणार होते. त्यांच्या नवीन नात्याला मयत महिलेच्या आई आणि भावाची संमती होती.

त्यामुळे ते दोघे एकत्र राहत होते. महेश हा लग्नासाठी आग्रह करीत होता. त्यास महिला नकार देत होती. त्यामुळे महेश याने चारित्र्यावर संशय घेऊन राहत्या घरात तिचा गळा आवळून खून केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.