Manchar News : अवसरी खुर्द येथे अवघ्या 29 दिवसात उभे राहिले 288 बेडचे जम्बो कोविड हॉस्पिटल

एमपीसी न्यूज – शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा उपयोग खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. अवघ्या 29 दिवसात प्रशासन व सर्वांच्या मदतीने हे उभे राहिले आहे.

यामध्ये 240 ऑक्सिजन व 48 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी 24 कोटी 24 लाख रूपये शासनाने मंजुर केले असले तरी यातील बहुतांश रक्कम पुढील एक वर्षातील वैद्यकिय उपचारासाठी वापरली जाणार आहे.

अवसरी खुर्द येथील शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा उत्पादन शुल्क, कामगार आणि गृह विभाग मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार, जुन्नरचे आमदार अतुल बेनके, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे आदी उपस्थित होते. यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी प्रास्ताविक केले तर शेवटी डॉ.अंबादास देवमाने यांनी आभार मानले. यावेळी शिवनेरी कोविड हॉस्पीटल साठी विविध कंपन्या, सहकारी संस्था, दानशुर व्यक्ति यांनी केलेल्या मदती बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी वळसे पाटील पुढे म्हणाले, गेली दीड वषार्पासून सर्वजण कोरोना महामारीचा सामना करत आहेत. या कालावधीत शेती, व्यापार, उद्योग सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडल्या. ही महामारी जेव्हा सुरु झाली तेव्हा तिचे स्वरुप माहीत नव्हते आता. मात्र आता पुरेशी तयारी झाली आहे. दुसरी लाट गांभीर्याने घेतली गेली नाही. या लाटेत तरुण,अनेक जिवाभावाची माणसे गेली, कर्ते पुरुष गेले, एकाच कुटुंबातील चार ते पाच व्यक्तींनी प्राण गमवावे लागले. उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली तर तिचा सामना करता यावा यासाठी तयारी असावी या भूमिकेतून हे जम्बो कोविड हॉस्पीटल सुरू केले आहे.

देशातील सर्व जनतेचे लसीकरण हाच कोरोनावर पर्याय आहे, राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे, कोरोना अद्याप गेलेला नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, त्यामुळे प्रत्येकाने आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असे आवाहन वळसे पाटील यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.