Manchar News : वॉकी-टॉकीवरुन दारू विक्री करणाऱ्या पती पत्नीसह दिरावर गुन्हा, 1.73 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – वॉकी-टॉकीच्या सहाय्याने दारू विक्री करणाऱ्या पती पत्नीसह दीर अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व मंचर पोलिसांनी शुक्रवारी (दि.9) हि संयुक्त कारवाई केली. त्यांच्याकडून 1.73 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी नीलेश बबन काळे, संतोष बबन काळे (रा. भावडी, ता. आंबेगाव, जि. पुणे) व नीता निलेश काळे यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील मौजे भावडी येथील हॉटेल मनोरंजन मध्ये नीलेश काळे व संतोष काळे हे दोन सख्खे भाऊ वॉकी-टॉकीचा वापर करून बेकायदेशीर दारू विक्री करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखा पथक व मंचर पोलीस यांनी पंचांसमक्ष हॉटेल मनोरंजन येथे छापा टाकला त्यावेळी नीलेश बबन काळे हा मागील दरवाजातून पळून गेला. हॉटेलची पंचांसमक्ष झडती घेतली असता, काउंटरजवळ देशी-विदेशी दारू व एक वाकी टॉकी आढळली.

त्यानंतर दुसऱ्या वॉकी-टॉकीबद्दल मिळालेल्या माहितीनुसार हाॅटेलच्या मागे असलेल्या रूममध्ये जाऊन नीलेश काळे यांच्या पत्नी नीता नीलेश काळे यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांच्याकडील दुसरा वॉकीटॉकी दिला.

त्यांच्याकडे रूमच्या चाव्यांची मागणी केली असता त्यांनी चाव्या पती व दीर यांच्याकडे असल्याचे सांगून रुमचे दरवाजे उघडण्यास असमर्थता दर्शवली.

त्यामुळे पोलिसांनी रुमचे कुलप तोडून तपास करता रूमच्या संडास व बाथरूम मध्ये देशी विदेशी दारूचा साठा आढळला. याठिकाणाहून 1 लाख 69 हजार 910 रुपयांची देशी-विदेशी दारू व चार हजार रुपयांच्या दोन वॉकी टॉकी असा एकूण 1 लाख 73 हजार 910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तीन जणांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई मंचर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, पोलीस हवालदार शंकर जम, पोलीस हवालदार शरद बांबळे, पोलीस नाईक दीपक साबळे, मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक अजित मडके, पोलीस नाईक विनोद गायकवाड, पोलीस शिपाई शिवाजी चितारे, पोलीस शिपाई एस. व्ही. गवारी यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.