Ex PM Manmohan Singh: शब्दांची निवड जपून करा, मनमोहनसिंग यांचा चीनवरुन पंतप्रधान मोदींना सल्ला

Manmohan Singh Speaks On PM Modi: Choose Words Carefully, Manmohan Singh Advises PM modi जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याचे दायित्व आहे. आपल्या लोकशाहीत हे दायित्व देशाच्या पंतप्रधानांकडे आहे.

एमपीसी न्यूज- गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या भारताच्या 20 सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये, असे वक्तव्य देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी केले आहे. मनमोहनसिंग यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधत आपल्या शब्द निवडीबाबत सावध होण्याचा सल्लाही दिला आहे. गत सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात चीन आणि भारतीय सैनिकांदरम्यान झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान हुतात्मा झाले होते तर चीनचे 40 सैनिक मारले गेले होते.

मनमोहनसिंग यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, 15-16 जूनला गलवान खोऱ्यात भारताच्या 20 साहसी जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे. या शूर सैनिकांनी साहसाबरोबर आपले कर्तव्य निभावताना देशासाठी आपल्या प्राणांचा त्याग केला. देशाच्या या सुपूत्रांनी आपल्या अंतिम श्वासापर्यंत मातृभूमीची रक्षा केली. या सर्वोच्च त्यागासाठी आम्ही साहसी सैनिकांचे आणि परिवाराचे कृतज्ञ आहोत. परंतु, त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही पाहिजे.


आज आम्ही इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभे आहोत. भविष्यातील पिढ्या आमचे आकलन कसे करतील हे, आमच्या सरकारचे निर्णय आणि सरकारकडून उचलण्यात आलेली पावले निश्चित करतील.

जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याचे दायित्व आहे. आपल्या लोकशाहीत हे दायित्व देशाच्या पंतप्रधानांकडे आहे. पंतप्रधानांनी आपले शब्द आणि घोषणांद्वारे देशाची सुरक्षा आणि सामरिक तसेच भूभागीय हितांवर पडणाऱ्या प्रभावाप्रती सदैव सावध असले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, चीनने एप्रिल 2020 पासून आजपर्यंत भारतीय सीमामध्ये गलवान खोरे आणि पेंगोंग शो लेकमध्ये अनेकवेळा बळजबरीने घुसखोरी केली आहे. आम्ही त्यांच्या धमकी किंवा दबावासमोर झुकणार नाही. आपल्या अखंडतेसाठी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.