Mann ki Baat: ‘लॉकडाऊन 5.0’ आणि ‘अनलॉक 1.0’ च्या तोंडावर पंतप्रधान मोदी आज मांडणार ‘मन की बात’

Mann ki Baat: PM Modi to Share 'Mann Ki Baat' today on 'Lockdown 5.0' and 'Unlock 1.0'

एमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना केंद्र शासनाने ‘लॉकडाऊन 5.0’ ची जाहीर करतानाच यापूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये मोठी शिथिलता आणत ‘अनलॉक 1.0’ देखील घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा रोडिओ कार्यक्रम आज (रविवारी) सकाळी 11 वाजता प्रसारित होत आहे. त्यामुळे आता मोदी देशवासीयांना काय सांगतात, याबाबत उत्सुकता आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून होत असलेला हा तिसरा ‘मन की बात’ कार्यक्रम असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता ‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतात. लॉकडाउन-5.0 आणि अनलॉक 1.0 ची घोषणा आणि आणि मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे यावेळी हा कार्यक्रम अधिक खास असणार आहे, असे बोलले जात आहे.

देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपुष्टात येत असून पुढील एक महिन्यासाठी लॉकडाउन-5.0 जाहीर करतानाच ‘अनलॉक-1.0’ची देखील घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात येणार आहेत. एकीकडे देशात कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना हा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेल्या 12 दिवसांत देशात 75 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंदणी झाली आहे तर1700 हून अधिक लोक मरण पावले. अशा परिस्थितीत देशात लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यामागची भूमिका पंतप्रधान स्पष्ट करतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आहे.

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील एक वर्ष पूर्ण

मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी आपल्या सरकारच्या यशाची व कामगिरीवर चर्चा करू शकतात. दुसर्‍या मुदतीच्या पहिल्या वर्षात मोदी सरकारने तिहेरी तलाक कायदा, जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचा निर्णय, 10 मोठ्या बँकांचे विलीनीकरण आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी यासारखी कठोर पावले उचलली. कोरोनाने संकटातही त्यांनी लॉकडाऊनसारखे अनेक कठोर निर्णय घेतले. ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी या कामगिरीचा उल्लेख करू शकतात.

पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तीन ऑक्टोबर 2014 ला मोदी यांनी ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम सुरू केला. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ते या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधतात. ‘मन की बात’चा  आज 65 वा कार्यक्रम असणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर यापूर्वी 29 मार्च आणि 26 एप्रिल या दोन दिवशी मोदींनी या माध्यमातून देशाला संबोधित केले होते. आज मोदींच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याची देशवासीयांमध्ये तीव्र उत्सुकता दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.