Mann Ki Baat : मन की बात कार्यक्रमात पंतप्रधानांचा महाराष्ट्र सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशींशी संवाद

एमपीसी न्यूज – कोरोनाविरूद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात कार्यक्रमात म्हणाले, त्यांनी यावेळी मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर आणि महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य शशांक जोशी यांच्याशी संवाद साधला. डॉ. जोशी देशातील सर्वोत्तम डायबेटोलॉजिस्ट आणि पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलताना डॉ. शशांक जोशी म्हणाले की, कोरोनाची ही जी दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे. पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गती जोरात आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे, ही याच्याबाबतीत दिलासादायक गोष्ट आहे.

या लाटेबाबत दोन- तीन फरक आहेत. पहिल्यांदा कोरोनाचा संसर्ग युवक आणि मुलांमध्येही थोडा दिसून येत आहे. त्याची जी श्वास लागणं, कोरडा खोकला येणं, ताप येणं ही पहिल्या लाटेसारखी लक्षणं तर आहेतच, परंतु त्याबरोबर वासाची जाणिव नष्ट होणं, चव न लागणं हीही आहेत. आणि लोक थोडे घाबरले आहेत. खरंतर लोकांनी घाबरण्याची अजिबात गरज नाही. 80 ते 90 टक्के लोकांमध्ये याची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

डॉ जोशी पुढे म्हणाले की “हल्ली एक नवीन प्रयोगात्मक औषध ज्याचं नाव रेमडिसिवीर आहे. त्याच्या वापरामुळे रूग्णाचा रूग्णालयात रहाण्याचा कालावधी दोन ते तीन दिवसांनी कमी होतो आणि क्लिनिकल रिकव्हरीमध्ये त्याची मदत होते. आणि हे ही औषध पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये. हे औषध थोड्या प्रमाणातच काम करतं.”

“ज्यांना प्राणवायुची आवश्यकता आहे, ते रुग्णालयात दाखल होतात. परंतु डॉक्टर सांगतील तेव्हाच बाहेरून प्राणवायु घेतला पाहिजे. लोकांनी हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आपण प्राणायाम केला, आपल्या शरिरातल्या फुफ्फुसांना जरासं विस्तारित केलं, आणि शरिरातलं रक्त पातळ करणारी जी इंजेक्शन्स येतात, ती घेतली, या छोट्या छोट्या औषधांनीही 98 टक्के रूग्ण बरे होतात. शिवाय, लोकांनी सकारात्मक रहाणंही खूप आवश्यक आहे. उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घेणं अत्यंत आवश्यक आहे. या महागड्या औषधांच्या मागं धावण्याची काहीच गरज नाही असे देखील डॉ. जोशी यांनी यावेळी सांगितले.

आपल्याकडे जगातले सर्वात उत्कृष्ट उपचार उपलब्ध आहेत, हे स्पष्ट करून डॉ. जोशी म्हणाले की, भारतात रूग्ण बरे होण्याचा सर्वात चांगला रिकव्हरी रेट आहे. आपण युरोप किंवा अमेरिकेशी तुलना केली तर आमच्याकडे रुग्ण उपचारांच्या नियमावलीनुसार बरे होत आहेत.

त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की “भारत सरकारकडून जो विनामूल्य लसीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे, तो पुढेही चालू राहिल. माझा राज्यांना आग्रह आहे की, त्यांनी भारत सरकारच्या या विनामूल्य लसीकरण मोहिमेचा फायदा आपल्या राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त प्रमाणात पोहचवावा.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.