Mann Ki Baat :‘व्होकल फॉर लोकल’चा संकल्प लक्षात ठेवा – नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज – दसऱ्यानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा देत पंतप्रधान मोदींनी आजच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधला. विजयादशमीचे पर्व हे असत्यावर सत्याच्या विजयाचे व एकप्रकारे संकटावर धैर्याच्या विजयाचे देखील पर्व असल्याचे त्यांनी सुरूवातीस सांगितले.

तसेच, सण-उत्सवांच्या काळात बाजारात खरेदीसाठी जाताना ‘व्होकल फॉर लोकल’चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केलं.

मोदी म्हणाले, जेव्हा आपण सण, उत्सवांबद्दल बोलतो, तयारी करतो तेव्हा सर्वात अगोदर मनात हेच येतं की, बाजारात कधी जायचं? काय खरेदी करायची? विशेषतः मुलांमध्ये याबद्दल मोठा उत्साह असतो. सणांचा हा उत्साह व बाजारातील चमक एकमेकांशी जुडलेली आहे. मात्र यंदा तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाल, तेव्हा ‘व्होकल फॉर लोकल’चा आपला संकल्प नक्कीच लक्षात ठेवा. बाजारातून सामान खरेदी करताना आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्राथमिकता द्यायची आहे.

आज तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने जगत आहात. मर्यादेत राहून उत्सव साजरा करत आहात. यामुळे जी लढाई आपण लढत आहोत. त्यात आपला विजय देखील निश्चित आहे. पूर्वी नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी होत होती. मात्र यंदा असे होऊ शकले नाही.

पूर्वी दसऱ्याला मोठमोठ्या जत्रा भरत असत. मात्र यंदा त्यांचे स्वरूप देखील वेगळेच आहे. रामलीलाच्या उत्सवाचे देखील मोठे आकर्षण होते. मात्र त्यावर देखील काहीना काही निर्बंध आले आहेत. मात्र, कोरोनाच्या या संकट काळात आपल्याला संयमानेच वागायचे आहे, मर्यादेतच राहायचे आहे, असंही मोदी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.