Manobodh by Priya Shende Part 62 : निजध्यास तो सर्व तुटोनि गेला

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 62 (Manobodh by Priya Shende Part 62)

निजध्यास तो सर्व तुटोनि गेला

बळे अंतरे शोक संताप ठेला

सुखानंद आनंद भेदे बुडाला

मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला

या श्लोकात समर्थांनी परमेश्वराप्रतीची श्रद्धा ढळली तर त्याचा काय परिणाम होतो ते सांगितलं आहे. एकदा का भगवंताच्या ठायी असलेला निजध्यास तुटून गेला की काय होतं ते समर्थ सांगत आहेत. परमेश्वराचा ध्यास माणसाला कायम असला पाहिजे. त्याच्या विषयी तळमळ ही सतत असली पाहिजे. हा ध्यास किंवा तळमळ आपल्या स्वार्थासाठी नसावी.त्या परमेश्वराचे नामस्मरण हे सतत.. अखंड असलं पाहिजे. कधीतरी सवडीने करू, जमेल तर आज नाहीतर उद्यापासून करू. असा डळमळीत.. पोकळ निश्चय उपयोगाचा नाही. त्यासाठी दृढनिश्चय असायला हवा.  परमेश्वराची आस लागली पाहिजे.  त्याशिवाय ईश्वर भेट होत नाही.  व्यवहारात सुद्धा आपल्याला काही साध्य करायचं असेल किंवा मिळवायचं असेल तर आपण त्याचा सतत ध्यास घेतो.  आणि पूर्ण ताकदीनिशी त्यासाठी कष्ट घेऊन ती गोष्ट मिळवतोच.  भगवंताच्या बाबतीत पण हेच आहे.  त्यालाच समर्थ निजध्यास म्हणतात.

MPC News Podcast 21 June 2022 : ऐका… आजचे एमपीसी न्यूज पाॅडकास्ट

आपल्या मनातला हा ध्यास गेला, की मन परत भरकटायला लागतं.  आपली तळमळ कमी होते.  पुन्हा आपण संसारातल्या सुख दुःखात बुडून जातो.  परत एकदा षड्रिपू मनाचा ताबा घेतात.  आणि मग आपोआपच इतर संसारिक माणसांप्रमाणे आपल्या अंतःकरणात शोक आणि संताप ठाण मांडून बसतात.  आपलं मन भरकटत जाऊन भौतिक सुखाकडे ओढलं जातं.  आणि मग पुन्हा सुख मिळालं की अजून पाहिजे असतं.  आणि ते मी मिळवलंय म्हणून अहंकार निर्माण होतो. आणि जर हे सुख मिळालं नाही, तर माणसाचा शोक वाढतो.  दुःख वाढतं आणि संताप वाढतो.

याउलट परमेश्वराच्या निजध्यासात, त्याच्या नामस्मरणात, त्याच्या चिंतनात.. जर आपलं मन गुंतवलं तर ही व्याधी किंवा दुःख आपल्या वाट्याला येत नाही.  त्याऐवजी आपल्याला सुखानंदाची प्राप्ती होते.  आपल्या वाट्याला सुखही येतं आणि आनंदही येतो.

एकदा का मनाची द्विधावस्था झाली.. मन डळमळलं  की परत आपण आहोत तिथेच येतो. मी परमेश्वराचे नामस्मरण का करू? तो मला खरच भेटणार का?  त्यापेक्षा आज जे सुख उपभोगायला मिळतय ते भोगून घेऊयात. पुढचं पुढे बघु. अशी आपली मनाची अवस्था झाली, तर माणूस परमेश्वराची उपासना करायची टाळतो आणि मग अर्थातच सुखानंदाला मुकतो.  त्यामुळे दृढनिश्चय महत्त्वाचा.  भगवंताचा ध्यास घेतला पाहिजे म्हणजेच भगवंत प्राप्ती होते.

Todays Horoscope 21 June 2022: जाणून घ्या आजचे राशीफळ

माणसं भगवंताचे चिंतन ऐवजी वादविवादात पडतात. त्या वादविवादाची रुची जास्त असते.  त्यामुळे वेळ वाया जातो.  हाती समाधानकारक काही लागत नाही आणि ते तो सन्मार्ग सोडून देतात. त्यांना त्याचा नंतर पश्चाताप होतो.  ह्या वादविवादामुळे त्यांचा ईश्वरप्राप्तीचा निश्चय ढळतो आणि ते शोकसागरात बुडून जातात. एकदा का परमेश्वरावरची श्रद्धा ढळली की, ती पुन्हा नव्याने निर्माण करणं कठीण होऊन बसतं.  म्हणूनच समर्थ सांगताहेत की निजध्यास कधी सोडू नको.  म्हणजे अंतःकरण शुद्ध राहील. मन मोकळे राहील. त्यामध्ये दुःख शोक संताप यांना स्थान राहणार नाही.  संत संगत धरावी. त्यांच्याकडून सन्मार्गासाठी मार्गदर्शन घ्यावं. त्यांच्याशी वितंडवाद सोडून देऊन आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घ्यावे जेणेकरून परमेश्वर प्राप्तीची ओढ लागून आपण सुखानंद अनुभवु शकू. नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल आणि नंतर त्याचा काही उपयोग होणार नाही.  त्यामुळे समर्थ सांगताहेत की वेळीच सावध व्हा.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.