सोमवार, डिसेंबर 5, 2022

Manobodh by Priya Shende : मनोबोध भाग 42 – बहुतांपरी हेचि आता धरावे

एमपीसी न्यूज – मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 42

बहुतांपरी हेचि आता धरावे

रघुनायका आपुलेसे करावे

दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे

मना सज्जना राघवी वस्ती कीजे

या श्लोकांमध्ये पहिल्या चरणात समर्थ सांगताहेत की, “बहुतांपरी हेचि आता धरावे”.  बहुतांपरी म्हणजे बहुतांशी लोकांनी केल्याप्रमाणे, जास्तीत जास्त संख्येने जो मार्ग अवलंबला आहे,  जो मार्ग सांगितला गेला आहे आणि त्यानुसार लोकांनाही वाटचाल केली आहे, तसंच तू पण कर. तीच गोष्ट मनात धर.  ती गोष्ट सोडू नकोस.  सारखी धरसोड वृत्ती चांगली नाही. एकदा का एखादी चांगली गोष्ट करायची ठरवली, ती सत्संग करणं असू दे, उपास, पूजा,अर्चा, ग्रंथवाचन, व्रतवैकल्य.. काही असलं तरी ते करायला घ्यायचं आणि नाना शंकांनी ती गोष्ट सोडून द्यायची.  त्यात आपल्याला काही मिळत नाहीये, हे दोन चार दिवसात असं वाटलं की, ते सोडून द्यायचं. असं न करता “हेचि धरावे” म्हणजे, हे न सोडण्यासाठी भक्कमपणे धर.  असं ते म्हणत आहेत.

आता कशाची वाटचाल करा? काय करून ठेवा? तर, “रघुनायका आपुलेसे करावे”.  आपल्याला सातत्यं ठेवायला सांगत आहेत.  ते कशाचं तर, रघुनायकाला.. परमेश्वराला.. भगवंताला, आपलंसं करायला सांगत आहेत. आता हे आपलंसं करणं, इतकी सोपी गोष्ट आहे का हो?

साधा व्यवहारातील उदाहरणं जर आपण पाहिलं तर, आपल्याला पाहिजे ते मिळवण्यासाठी लोकांना विनवावं लागतं,  त्यांची स्तुती करावी लागते,  त्यांच्या मनासारखं वागावं लागतं,  त्यांची सेवा करावी लागते,  त्यांना खूष ठेवावं लागतं.  त्यांची मनधरणी करावी लागते. आणि हे सगळं फक्त आहे का सुखासाठी असतं, जे की क्षणिक आहे.   तर विचार करा, आपल्याला परमेश्वराला आपलंसं करायला समर्थ सांगताहेत.  ते इतका सोपं असेल का हो?  त्याला जे आवडतं ते करणं, तुम्ही फक्त त्याचेच आहात यासाठी, अनन्यभावाने भक्ती करणं, सगळी सुखदुःख त्याच्यावर सोपवणं. सतत त्याच्याच विचारात राहणं. जराशी शंका नको.  अतूट विश्वास, प्रचंड निष्ठा हवी.  आपला अहंकार सोडून सोsहम सोsहम चा ध्यास धरणं.. इतकं सोपं नाहीये ते.

पण जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल,  चिरंतन समाधान हवं असेल, निर्भयपणे जगायचं असेल तर, रघुनायकाला, परमेश्वराला आपलंसं करण्याखेरीज पर्याय नाही, हेच संत मंडळी सांगतात.

ज्या मार्गाने बहुतांशी लोकांची वाटचाल चालू असते, तेच आपल्याला ही समर्थ करायला सांगत आहेत.  याचं कारण असं आहे की, “दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे”.  तो दीन अनाथांचा पालन-पोषण कर्ता आहे.  तो अत्यंत कृपाळू आहे.  संरक्षणासाठी सदैव सज्जं आहे. भक्तांची संसारातील सुखदुःखे झेलणारा आहे.  भक्तांना अभय देतो. त्यांचा उद्धार करतो. त्यांना मोक्ष देतो.  आणि हे सगळं तो भक्तांसाठी तत्परतेने, त्याचं कर्तव्य म्हणून करतो. आपण आत्तापर्यंत अशी कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत,  जिथे तो भक्तांच्या मदतीसाठी उडी मारतो आणि सामर्थ्याने त्याच्या संकटाचा सामना करतो.  म्हणूनच परत एकदा समर्थ म्हणताहेत की, राघवाठायी तू, तुझी जागा मिळव. “मना सज्जना राघवी वस्ती कीजे”.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

Latest news
Related news