Manobodh by Priya Shende Part 101 : मनोबोध भाग 101- जया नावडे नाम त्या येम जाची

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 101 –

जया नावडे नाम त्या येम जाची

विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची

म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे

मुखे बोलता दोष जाती स्वभावे

ह्या श्लोकात समर्थ आपल्याला रामनामाचा महिमा सांगत आहेत.

कधी कधी माणसाला सरळ काही सांगितलं तर पटत नाही. मग तीच गोष्ट न केल्याने काय परिणाम होतील, काय वाईट घडेल ते सांगितलं तर थोडं तरी कळतं.

पहिल्या चरणात ते म्हणताहेत की, “जया नावडे नाम त्या येम जाची”. जया नावडे नाम म्हणजेच ज्यांना रामनाम घ्यायला आवडत नाही, त्याचं महत्त्व ते जाणत नाहीत किंवा जाणून पण रामनामाचा नेम करत नाहीत. नामस्मरण करत नाहीत. त्याची आस ते धरत नाहीत. भक्तीपूर्वक, श्रद्धापूर्वक करत नाहीत, तर समर्थ म्हणतात की अशा माणसांना येम जाची.

म्हणजे त्यांना यमाचा जाच सहन करावा लागतो. मृत्यूला सामोरे तर प्रत्येकाला जायचंय, कारण मृत्यू हा अटळ आहे. पण या देहातून मुक्ती न मिळाल्याने त्या आत्म्याला परत जन्म घ्यावा लागतो. तो परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. परत त्याच वेदना सहन कराव्या लागतात. यम म्हणजे साक्षात मृत्यु. कर्दनकाळ. जो कोणी नामस्मरण करणार नाही, त्याचं मन हे प्रापंचिक आसक्तीमधून बाहेर पडणार नाही. त्याचा आयुष्य संपलं तरी मन ऐहिक सुखाकडे ओढ घेईल. त्यामुळे अंतसमयीच्या इच्छा, वासना अपूर्ण राहिल्याने तो परत जन्मं घेईल आणि परत मृत्यूच्या फेऱ्यात अडकेल. आणि हा जन्म-मृत्यूचा फेरा म्हणजेच यम आहे.

दुसऱ्या चरणात समर्थ सांगताहेत की,”विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची”. जो माणूस रामनाम घेण्याऐवजी त्याबद्दल साशंक होतो. विकल्प म्हणजे शंका. ज्याच्या मनात शंका उत्पन्न होते. मनात द्वंद्व निर्माण होतो. त्याला नरक येताना भोगाव्या लागतात. आणि त्याची सर्वत्र छी थू होते. म्हणजेच ज्याच्या मनात शंका आहेत तो नुसतेच तर्क वितर्क करत राहतो. खरं काय खोटं काय हे त्याला कळत नाही. त्यामुळे नामस्मरणाच्या मार्गाला तो स्वतःही जात नाही आणि दुसऱ्याचेही कान तो भरवीत बसतो.

अशी लोकं मनाने अस्थिर असतात. त्यामुळे असं अस्थिर मन ऐहिक सुखाकडे धावतं आणि वासनारूपी नरकात तो बुडून जातो. परस्त्री, मदिरा अजून अन्य व्यसनांच्या आहारी जातो. त्याला त्यातच समाधान वाटतं. आणि शेवटी त्याला फक्त दुःखाला सामोरे जावे लागतं. जिवंतपणी त्याला नरकयाताना भोगाव्या लागतात आणि मग त्याची समाजात छी थू होते.

इतके त्याचे दुष्परिणाम आहेत तर आपण रामनामाचा साधा-सोपा मार्ग अंगिकारावा म्हणून पुढे समर्थ म्हणतात की, “म्हणोनी अती आदरे नाम घ्यावे”. आपल्याला षड्रिपूंच्या, वासनेच्यामुळे नरक याताना भोगाव्या लागणार आहेत. आपली वाटचाल मुक्तीकडे होणार नाहीये. मृत्यू समयी यातना होणार आहेत. जन्मं मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणार नाहीये. तर त्यावर साधा उपाय, रामबाण -खात्रीचा उपाय म्हणजे रामनाम घेणे. तर ते करा. ह्या मार्गाला लागा. अत्यंत आदराने, प्रेमाने, श्रद्धेने नामस्मरण करा, असं समर्थ सांगताहेत.

पुढच्या चरणात ते म्हणतात की, “मुखे बोलता दोष जाती स्वभावे”. म्हणजे एकदा का नामस्मरण चालू केलं म्हणजे आपल्यातले दोष सहज निघून जातील. दोष निघून गेले की आपोआपच दोषांची जागा सद्गुण घेतील. मन स्थिर होईल. एकदा का मन मोकळं झालं, म्हणजे ते आपोआप ऐहिक सुखाकडे धावण्याऐवजी परमार्थाकडे धावू लागेल, आणि मग मनाला खरी परमेश्वर प्राप्तीची ओढ लागेल आणि मोक्षाचा मार्ग सापडेल.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.