Manobodh by Priya Shende Part 12 : मनोबोध भाग 12 – मना मानसी दुःख आणू नको रे

एमपीसी न्यूज – मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक बारा

मना मानसी दुःख आणू नको रे

मना सर्वथा शोक चिंता नको रे

विवेके देहबुद्धी सोडूनी द्यावी

विदेही पणे मुक्ती भोगीत जावी

इथे समर्थ रामदास आपल्याला पहिल्या दोन चरणात सांगत आहेत की, हे मना तू तुझ्या मनात दुःख आणू नको आणि त्याचा शोक करत बसू नको.

आपल्याला मागे घडून गेलेल्या घटनांमध्ये गुरफटून जाऊन त्याच दुःख करत बसायची सवय असते. त्याचाच शोक करायची सवय असते. खरं तर मागील घटना उकरून काढून त्याच त्याच गोष्टींवर पुन्हा दुःख करण्यात काही अर्थ आहे का? त्याचा शोक करण्यात काही अर्थ आहे का? किती त्या दुःखाला कवटाळून बसायचं. त्यामुळे वर्तमान बिघडून आपल्या कर्मात अडथळे आणायचे?

मागील घटनांचा शोक आणि भविष्यात कसं होणार याची चिंता ह्यामुळेच तर सतत माणूस दुःखात राहतो. खरं म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यावर माणसाची काहीही सत्ता नसते. हे दोन्ही माणसाच्या कंट्रोल मध्ये नाहीये. त्याचं दुःख कशाला करावं? आणि चिंता तरी कशाला करावी? जे घडून गेले सांडून गेले त्यावर चर्चा करून काही उपयोग नाही. मग आपल्या हातात काय आहे…. फक्त वर्तमान काळ.

हा वर्तमान काळ कसा जगावा..हे समर्थ आपल्याला पुढच्या चरणात सांगत आहेत की देहबुद्धीचा त्याग कर आणि देह यामुळे जे काही विकार आहेत किंवा दुःख आहेत त्याकडे दुर्लक्ष कर. कारण देहच मुळात नाशवंत आहे.

याचा अर्थ असा नाहीये की या देहाची निगा राखून नये, किंवा काही दुखापत झाली तर उपचार करू नयेत. समर्थ मारुती भक्त पण होते. त्यामुळे व्यायामाचे पण उपासक होते. व्यायामामुळे त्यांनी आपली शरीरयष्टी सुदृढ केली होती. पण देहाचे चोचले लाड पुरवू नयेत असा अर्थ इथे अभिप्रेत असावा. देहात दुःख हे कुरवाळत बसू नये. आपण विदेही असल्याप्रमाणे मुक्तीचा आनंद भोगत जा असं समर्थ म्हणताहेत.

तुकाराम महाराजांनी आपल्याला हेच सांगितले आहे

ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान

तुकाराम महाराजांना देखील कित्येक दुःख सोसावे लागली तरी, ते कायम म्हणतात – बरं झालं देवा.. म्हणजे त्या दुःखातही त्यांनी सुख पाहिलं.

हेच जर आपल्याला जमलं तर आपलं मन स्थिर होऊन विवेकबुद्धीने आपण विदेही पणा कडे वाटचाल करू शकतो.

विदेही पण म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त होणे. हे काय करावं तर सगळ्यात दुःखाचं मूळ आहे ताे म्हणजे देह.

या देहाला उत्तम खाणं पाहिजे, पिणं पाहिजे, उंची वस्त्र पाहिजेत, रहायाला आलिशान बंगला पाहिजे, फिरायला शानदार गाडी पाहिजे, सगळ्या उत्तम सुविधा पाहिजेत, सगळं ह्या देहासाठीच. आपण या देहाचे लाड पुरवण्यातच अख्खं आयुष्य घालवतो आणि मग नेमकं तिथेच चुकतं. त्यासाठीच देहबुद्धीचा त्याग केला पाहिजे. आणि त्यासाठी विवेकाचा आधार घेतला पाहिजे असं समर्थ सांगताहेत.

विवेकाने देहबुद्धी सोडून द्यावी. चांगल्या वाईटाचा सारासार विचार म्हणजे विवेक. तर या विवेकाने आलेल्या प्रसंगावर सुखदुःख वर मात करावी आणि ही देहबुद्धी सोडून द्यावी. शरीराचे लाड करणं सोडून द्या आणि विदेहीपणा कडे वाटचाल करा. देहापासून अलिप्त रहाणे म्हणजे विदेही पण एकदा ते अंगिकारलं की मग देहाचा दुःख त्याचा बडेजाव न राहता मुक्तीचा आनंद घेऊ शकतो. त्यासाठी विवेकबुद्धीने आपली सुख दुःख सोडून दिली पाहिजे.

एका वेगळ्या पातळीवर समर्थ आपल्याला नेत आहेत. संसारातून त्यांच्या सुखदुःखात हळूहळू कसं बाहेर पडायचं, देहाच्या पुरवल्या जाणाऱ्या लाडातून कसं बाहेर पडावं, आणि का बाहेर पडावं, याचं मार्गदर्शन समर्थांनी ह्या श्लोकातून केलं आहे. या श्लोकात विदेही मुक्तीची तोंड ओळख केली आहे. विदेही मुक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर, विवेकाने देहबुद्धी सोडावी. मग ती अनुभूती मिळू शकेल.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.