Manobodh by Priya Shende Part 16 : मनोबोध भाग 16 – मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

एमपीसी न्यूज – मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक सोळा

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे

अकस्मात तोही पुढे जात आहे

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते

म्हणोनी जनी मागुता जन्म घेते

श्लोक पंधरा मध्ये आपण पाहिलं की जन्म आणि मृत्यू माणसाच्या हातात नाही, हेच सत्य आहे. जे स्वीकारलं पाहिजे. मिळालेल्या मधल्या काळात सत्कर्म करावं. ज्यासाठी जन्माला आलो ते काम करावं. चिरंजीव असल्यासारखे बेदरकारपणे जगू नये. आपल्याला नेमून दिलेलं काम कोणतं ते सचोटीने करावं.

आता ह्या श्लोकात समर्थ पुढे जाऊन सांगत आहेत की, ज्याला मृत्यू येतो त्याचा शोक दुसरेच करतात. तो स्वतः तर स्वतःच्या मरणाचा शोक करू शकत नाही. त्याचे मित्र, आप्तेष्ट, सहकारी किंवा त्याचे प्रियजन हे त्याचा शोक करत राहतात. ते इतका शोक करतात की, जणू त्यांचं सर्वस्व गेलं. आता जगण्यातही काही अर्थ नाही इतकं दुःख होतं. पती-पत्नी पैकी एखादा मृत्यू पावला तर, उरलेला पुढचं आयुष्य कसा पार पडेल ह्या चिंतेत, यातनांमुळे काही काळ शोक, दुःख अनावर होतं. पण अकस्मातपणे म्हणजे पुढे जाऊन कोणत्याही एका क्षणी तो शोक करणारा माणूस, त्या काळाच्या ओघात पुढे जातो. तो किती दिवस दुःख करणार?

त्याच्या आयुष्यात जे कर्म करायचे ते त्याला करायला शोक विसरून पुढे जावंच लागणार ना? तर समर्थ म्हणत आहेत की हे सत्य जर आपल्याला माहित आहे की मृत्यू हा येणारच आहे एक दिवस. तर तुम्ही त्याचा शोक करत बसू नका हे इतकं सोपं नाहीये. पण ते दुःख कवटाळून ठेवून, तुम्ही त्याचा त्रास करून घेऊ नका. तर तुमचं जगण्याचं लक्ष्य शोधून काढा आणि विवेकबुद्धीने सत्कर्म करा, शिवाय आपल्यालाही या मार्गाने जाऊन मृत्यूशी सामना करायचा आहे, जे अटळ आपल्यासाठीही आहे.

हे लक्षात ठेवून कर्म करावे. मृत्यूची जाणीव जर आपल्या मनात असेल तर जगण्याची आसक्ती कमी होईल आणि लोकांचा लोभ कमी होईल. आपल्या मनात जर लोभ असेल, ईर्ष्या असेल, षड् रिपूंनी काबीज केला असेल, क्षोभ, चीड असेल, तर त्यातून बाहेर पडा. कारण ते जर मनात राहिलेलं असेल तर, त्याचं काय होणार, तर सर्वांनाश होणार.

मुक्ती मिळणार नाही. मुक्ती मधला मोठा अडथळा असेल. मानवाचा अंतिम ध्येय आहे मोक्ष मिळवणे आहे. जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका म्हणजेच मुक्ति किंवा मोक्ष. म्हणून समर्थ सांगताहेत की अपूर्ण इच्छा, मोह, वासना, सतत कसलं ना कसलं तरी आकर्षण, हव्यास याच गोष्टीमुळे आपण परत परत जन्ममृत्यूच्या फेर्‍यात अडकत जातो.

पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते
म्हणोनी जनी मागुता जन्म घेते

गेलेल्या चा शोक करत बसू नये. आपल्या आयुष्याचं कर्म काय आहे ते शोधा. ते सन्मार्गाने जाऊन करा. कसलाही लोभ, क्रोध, ईर्षा, आकांक्षा न बाळगता कर्म करत राहा. नाहीतर मग “पुनरपि जननं पुनरपि मरणं” हे चालूच राहील. त्यातून मुक्ती मिळणार नाही. मोक्ष मिळणार नाही.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.