Manobodh by Priya Shende Part 29 : मनोबोध भाग 29 – पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 29 (Manobodh by Priya Shende Part 29)

पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे

बळे भक्तरिपुशिरी कांबी वाजे

पुरी वाहिली सर्व जेणें विमानी

रुपेश एकदा राम दासाभिमानी

या श्लोकामध्ये समर्थ म्हणताहेत की, “पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे, बळे भक्तरिपुशिरी कांबि वाजे”. श्री रामाचे ब्रीद आहे म्हणजे त्यांचं ते एक कर्तव्य आहे की दुःखी, पीडित, पतितांना पावन करणे. त्यांच्या भक्तांना मदत करणे. त्यांच्या भक्तांचा उद्धार करणे.

जगामध्ये सुष्ट आणि दुष्ट अशी दोन्ही प्रकारची माणसं आहेत. दुष्ट माणसा सृष्टांना नेहमीच त्रास देतात. आपण नेहमी ऐकत आलो आहोत की ऋषी-मुनी यज्ञ करायला लागले की पहिले दानव किंवा राक्षस यज्ञात विघ्न आणायचे. जिथे चांगली माणसं तिथे वाईट माणसं पण असतातच. तसेच भक्त पण परमेश्वराची भक्ती करत असतील संसार सोडून किंवा संसारात राहून ते चांगल्या मार्गाला जात असतील तर बाकी संसारी किंवा सामान्य माणसांना ते रुचत नाही आणि त्या भक्तांनी पुढे जाऊ नये म्हणुन त्यांना त्रास देतात. त्यांचा छळ करतात. यामध्ये आपण संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज अशी कितीतरी उदाहरणं सांगू शकू. (Manobodh by Priya Shende Part 29)

SSPU : ‘उमेद जागर’ प्रशिक्षणाद्वारे कोविड प्रभावित महिलांचे सक्षमीकरण

हे संत इतके भगवान चरणी घट्ट ठाण मांडून बसलेले असतात की त्या दुष्ट माणसांच्या त्रासामुळे ते स्वतःचा निश्‍चय ढळू देत नाही आणि त्यांना जरी त्रास भोगावा लागला तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात. ते दुर्जन म्हणजे या भक्तांचे शत्रूच आहेत. अशा शत्रुंचा नाश करायला शेवटी भगवंतांनाच शस्त्र धारण करावं लागतं आणि ते भक्ताचे रक्षण करतात. त्यासाठी ते शत्रूवर शस्त्र उचलतात.

परित्राणाय साधुनाम
विनाशाय च दुष्कृताम्
धर्मसंस्थापनार्थय
संभवामि युगे युगे

आपल्या मनात मग असा विचार येऊ शकतो की, एवढे ज्ञानी, ऋषिमुनी, शूर वीर होऊन गेले, मग ते का नाही दुष्टांचा संहार करत? त्यासाठी भगवंताने का अवतार घ्यायचा? याचं कारण हेच आहे की, सामान्य माणूस हा फक्त समोरच्या परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो किंवा स्वतःचा उद्धार करू शकतो. ऋषी मुनी, ज्ञानी हे दुष्टांचे हनन करण्याचं कार्य न करता ते सज्जनांचे रक्षण करतात. परंतु अवतारी पुरुष मात्र सदधर्माची प्रतिष्ठापना करतात. सज्जनांचे रक्षण पण करतात आणि दुष्टांचा संहार पण करतात. इथे समर्थ आपल्याला विश्वास देतात की प्रत्यक्ष भगवंत तुमचं रक्षण करणारा आहे. तो शत्रूचा विनाश करण्यासाठी कोदंडधारी सज्ज आहे.

यापुढे समर्थ म्हणताहेत की, “पुरी वाहिली सर्व जेणे विमानी”. म्हणजे अयोध्यापुरी मधली सर्वच माणसं ही, श्रीरामाचे भक्ती करायला लागली, कारण ते रामराज्य होतं. एक अत्यंत आदर्श रामाचं ते राज्य होतं. आनंद, समाधान, भक्तीने ओतप्रोत भरलेलं ते राज्य होतं. तिथेच सर्व भक्तांना श्रीरामाने विमानाने वैकुंठ दर्शनासाठी चा रस्ता दाखवला. म्हणजेच मुक्तीसाठी भक्तिमार्ग दाखवला. (Manobodh by Priya Shende Part 29)

असे ते श्रीराम भगवंत हे, नेहमीच दासाचा अभिमान बाळगणारे आणि त्यांची उपेक्षा न करणारे म्हणजे त्यांच्याकडे दुर्लक्ष न करणारे असतात.
म्हणून समर्थ पुन्हा एकदा म्हणतात “नुपेक्षी एकदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.