Manobodh by Priya Shende Part 30: समर्थाचिया सेवका वक्र पाहे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 30

(Manobodh by Priya Shende Part 30)

समर्थाचिया सेवका वक्र पाहे

असा सर्व भूमंडळी कोण आहे?

जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

समर्थांच्या अत्यंत गाजलेल्या श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. एकदा का तुम्ही सेवक झालात की भगवंत तुमची काळजी घेतो. त्यासाठी पहिल्या दोन चरणात समर्थ म्हणत आहेत कि, “समर्थाचिया सेवका वक्र पाहे,
असा सर्व भूमंडळी कोण आहे”?

समर्थ आपल्याला आश्वासन देत आहेत की भगवंत आपल्या सेवकांचं संरक्षण करतो. त्या सेवकाकडे कुणी वक्रदृष्टीने म्हणजे वाकड्या नजरेने बघण्याची कुणी हिंमत तरी करेल का? असा कोणी त्रास देणारा अख्या भुतलावर शोधून सापडेल का? कारण त्याच्या संरक्षणासाठी शस्त्र घेऊन साक्षात भगवंत उभे ठाकतात.

आता इथे सेवक हा शब्द वापरला आहे. सेवक म्हणजे कोण नोकरी करणारा, लोकांची सेवा करणारा? तर नाही. जो आपल्या धन्याची म्हणजे ईश्वराची सेवा करतो संसार करताना सुद्धा सदोदित ईश्वराचे नामस्मरण करतो.

Rakshak Matrubhumiche : जाणून घ्या… सशस्त्र सेना दलातील करियरच्या संधी!

आपल्या धन्याची सेवा करणे म्हणजे आपल्या जन्माचं सार्थक झालं असं समजून, जे सेवेप्रती आणि धन्या प्रती निष्ठा ठेवतात. याचाच अर्थ त्यात कसलाही व्यवहार नसतो. अनन्यभावाने ही सेवा करतात, त्यांना समर्थ सेवक असं संबोधत आहेत. अशा सेवकावर (Manobodh by Priya Shende Part 30) भगवंत आपली कृपादृष्टी ठेवतो. त्यामुळे कोणी वक्र दृष्टीने पाहू शकत नाही म्हणजेच एकदा माणूस सेवक झाला त्यातून ईश्वराचा लाडका झाला की तो आपोआप सुखदुःखाच्या पलीकडे पोचतो. त्याला कसला त्रास जाणवत नाही. तहानभूक हरपून भक्ती करत असतो. परमेश्वर चरणी लीन होतो म्हणूनच, त्या सेवकाच्या संरक्षण भगवंत करतो.

ज्या भगवंताच्या लीला पृथ्वी स्वर्ग पाताळ अशा प्रयोग यातून वर्णन करतात. त्या भगवंताची स्तुती करतात. त्याला पूजतात. असा हा भगवंत आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही. त्याचा उद्धार करतात. त्यामुळे सेवक निर्भय होतो. पण त्यासाठी उच्चप्रतीची भक्ती आणि भगवंतावर निष्ठा हवी. म्हणूनच समर्थ दिलासा देत आहेत की, “जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.