Manobodh by Priya Shende Part 37 : मनोबोध भाग 37 – सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 37.(Manobodh by Priya Shende Part 37)

सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा

उडी घालितो संकटी स्वामि तैसा

हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी

 

 या श्लोकात पण एक छान उदाहरण दिलेला आहे. पहिल्या चरणात समर्थ म्हणतात की, “सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा”, पुढे ते म्हणतात की, “उडी घालितो संकटी स्वामि तैसा”.

जेव्हा जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा तेव्हा भगवंत त्याच्या मदतीला धावून येतात.  यासाठी समर्थ आपल्याला चक्रवाकाचं उदाहरण देत आहेत.

चक्रवाक पक्षाचा नर आणि मादी यांची अंधार पडल्यावर ताटातूट होते.  अंधारात त्यांना दिसत नाही.  एकमेकांची आर्त साद ऐकू येते, पण अंधारामुळे ते भेटू शकत नाहीत. शेवटी ते सुर्योदयाची म्हणजे मार्तंड ची वाट बघतात.  त्यांच्यावर आलेल्या या संकटाचा रक्षणाला किंवा मदतीला सूर्य जसा कारणीभूत होतो तसा आपला परमेश्वर संकटात उडी घालून म्हणजे तात्काळ भक्तांवरच्या संकटात रक्षण करतो.

चला रात्र, दिवस, स्थळ, काळ काही नाही. जिथे कुठे भक्तांवर संकट दिसलं तिथे तो पोचतो. फक्त त्यासाठी भगवंताची भक्ती केली पाहिजे.  त्याच्या निकट जाण्याची आंतरिक तळमळ लागली पाहिजे.  संकटात धावा केला पाहिजे.  तूच मला या संकटातून सोडवू शकतो, अशी करुणा भाकली पाहिजे.  भगवंताला शरण गेले पाहिजे. मी समस्या सोडवू शकतो असा अहंभाव असेल तर, तो कशाला मदत करायला येईल? भक्ताने अनन्यभावाने भक्ती केली पाहिजे. तरच परमेश्वर भक्ताच्या हाकेला धावून येतो.

संत मंडळींना तर कोणी त्रास दिला, तर तो त्यांना त्रास वाटतच नाही. कारण त्या सुखदुःखाच्या पलीकडे हे संत जण पोचलेले असतात.

पुढे समर्थ म्हणताहेत की, “हरिभक्तिचा घाव गाजे निशाणी,”  जिथे-तिथे हरी भक्तीचा महिमा गाजतो आहे. त्याची निशाणी गाजते आहे. वेदशास्त्र, पुराण, उपनिषदं सगळे आपल्याला हेच सांगत आहेत. ऋषी-मुनी, तपस्वी यांनी हेच सांगितले की, देवावर निष्ठा ठेवा.  त्याची भक्ती करा.  त्याचीच आठवण ठेवा.  म्हणजे देव पण तुमची आठवण ठेवेल.  तुमच्या मदतीला धावून येईल.

श्लोक क्रमांक 28 पासून ते श्लोक क्रमांक 37 अशा दहा श्लोकातून हेच विश्वासाने सांगितले आहे की, राम आपल्या भक्तांची कधीही उपेक्षा करत नाही.  त्यासाठी त्यांनी वेगवेगळी उदाहरणे देऊन मनाला पटवून दिला आहे आणि मनाला ईश्वरचरणी राहण्यास सांगितलं आहे. “नुपेक्षी कदा राम दासाभिमानी”.

जय जय रघुवीर समर्थ 

– प्रिया शेंडे (Manobodh by Priya Shende Part 33)

मोबाईल नं. 7020496590

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.