Manobodh by Priya Shende Part 43 : मनोबोध भाग 43 – मना सज्जना एक जीवी धरावे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 43 – Priya Shende Part 43
मना सज्जना एक जीवी धरावे
जनी आपले हित तुवा करावे
रघुनायकावीण बोलो नको हो
सदा मानवी तो निजध्यास राहो

 

या श्लोकात (Priya Shende Part 43) एक अत्यंत उपयुक्त गोष्ट समर्थ सांगताहेत, ती म्हणजे, “मना सज्जना एक जीवी धरावे,  जनी आपले हित तुवा करावे”.
म्हणजे ते मनाला उपदेश करत आहेत की, हे मना, तू एकच गोष्ट ध्यानात ठेव किंवा नीट समजून घे की, आपले स्वतःचे हित हे आपणच करायचं आहे.  त्यासाठी मार्ग आपणच शोधायचा आहे. आपलं हित साधण्यासाठी नुसता खटाटोप पण नाही करायचा तर, ते साध्य करण्यासाठी लागणारा त्यागही करायचा आहे.   कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते.  आपण काही न करता आपोआप तर मिळतच नसते.  त्या गोष्टीचा ध्यास घ्यावा लागतो.

साधं व्यवहारातलं उदाहरण घ्या,  नामांकित खेळाडू, गायक, नट नटी, यांना पैसा प्रसिद्धी मिळते.  पण कित्येक गोष्टींचा त्यांना त्याग करावा लागतो.  त्यांच्या खाण्यापिण्यावर, इतर बऱ्याच गोष्टींवर किती मर्यादा येतात.  समाजात सामान्य माणसांसारखं, कुठेही जाणं- येणं पण मुश्कील होतं त्यांचं. तर असं हे काही मिळवायचं असेल तर,  काही सोडावं लागतं.  त्याग करावा लागतो.
आपलं हित हे आपल्यालाच बघायचं आहे आणि त्यासाठी कष्ट पण आपल्यालाच करायचे आहेत.  मग ते करिअर असु दे, व्यवसाय, कला, तंत्र कशातही.. यशस्वी व्हायचं असेल तर, त्यासाठी एक सुनिश्चित ध्येय ठेवून, त्याच्या मार्गक्रमणेसाठी आपल्याला अपार मेहनत घ्यावी लागते.   हे जर इतकं व्यवहारात असेल,  तर परमेश्वर प्राप्ती ही किती पुढची गोष्ट आहे.

Manobodh by Priya Shende : मनोबोध भाग 42 – बहुतांपरी हेचि आता धरावे

आपला आयुष्यं समाधानी आणि आनंदी घालवायचं असेल तर,  समर्थ पुढच्या चरणात सांगताहेत की,” रघुनायकावीण बोलो नको हो,  सदा मानवी तो निजध्यास राहो”.
माणसाला त्या परमेश्वराचा रघुनायकाचा सतत ध्यास घेतला पाहिजे. ध्यास – शब्द कसे चपखल आहेत समर्थांचे.  ध्यास म्हणजे सतत एकच विचार.  त्याचाच आचार.  दुसरा विचारच नाही.  तर असा ध्यास त्या परमेश्वराचा घेतला पाहिजे.  आंतरिक तळमळ त्या रघुनायकाची असली पाहिजे.  त्याच्याशिवाय दुसरं बोलणंच नको.
आपलं हित जर, आपल्याला कळलं, ते म्हणजे, स्वतःचा उद्धार करून, मोक्षाच्या मार्गाने जायचंय.  परमानंद प्राप्तं करायचा आहे.  तर त्यासाठी मार्ग, तू शोधून काढून, संतांच्या आदेशानुसार पालन कर.  आपली सांसारिक सुख दुःख देवाला अर्पण कर.  आणि त्याच्या भक्तीत रंगून जा. सतत ईश्वराचा ध्यास धर.  त्यासाठी मेहनत तुलाच करायची आहे.  ऐहिक सुखाचा त्याग किंवा अहंकाराचा त्याग करून, ईश्वर चरणी लीन व्हायचं आहे.  ईश्वराखेरीज दुसरा विचार पण करायचा नाही.   फक्त त्या परमेश्वराला अनन्यभावाने शरण जायचंय आणि तुझं हित तुलाच साधायचंय.
जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.