Manobodh by Priya Shende Part 48 : सदा देवकाजी झिजे देह ज्याचा

एमपीसी न्यूज – मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 48 (Manobodh by Priya Shende Part 48)

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा
सदा रामनामे वदे नित्य वाचा
स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा
जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

या श्लोकात आपण धन्य झालेल्या भक्तांची वर्णन बघतो आहोत.  पहिल्या चरणात समर्थ म्हणत आहेत की,”सदा देवकाजी झिजे देह ज्याचा.” सदा म्हणजे सतत, अहोरात्र. देवा काजी म्हणजे देवकार्यासाठी, म्हणजे देवाने दिलेले कार्य. देह ज्याचा, म्हणजे आपला संपूर्ण देह झिजवतो. म्हणजे सतत, अहोरात्र जो भक्त आपला देह चंदनासारखा झिजवतो. तो कशासाठी? तर देवकार्यासाठी.  म्हणजेच जे काही काम हातात आलंय ते भगवंताने दिलेलं आहे, असं समजून तो उत्तम रित्या पार पाडतो.

प्रपंचात करायचा आहे.  प्रपंच करावा नेटका असे म्हणलेलं आहे.  परंतु त्याच्या मोहाला बळी पडून परमार्थ विसरायचा नाही.

देवकार्य दोन प्रकारची आपण समजू शकतो.  एक तर, स्वतः प्रपंच नेटका करता करता परमेश्वराचे नाव घेत स्वतःचा उद्धार करून घेणे.  स्वतः मोक्षाच्या मार्गाने वाटचाल करणे आणि दुसरे म्हणजे स्वतःचा उद्धार करता करता दुसऱ्यांना त्या मार्गाची ओळख करून देऊन, त्याची गोडी लोकांना लावणे.  भक्तिमार्गाचे महत्त्व सांगून त्यांना परमार्थाची वाट दाखवणे.  फक्त संसारात न रमता,  मुक्तीकडे कशी वाटचाल करावी हे सगळ्यांना पटवून देणे.

तर असं स्वतःसाठी आणि लोक उद्धारासाठी जे, आपला देह चंदनाप्रमाणे झिजवत असतात, ते खरे भक्त. चंदन झिजल्या शिवाय त्याचा सुगंध पसरत नाही.  त्याप्रमाणे भक्तही राष्ट्र प्रेमासाठी, लोकं उद्धारासाठी, स्वतःच्या उद्धारासाठी, आपला देह सदोदित सतत झिजवत असतात.

पुढे समर्थ म्हणताहेत की,”सदा रामनामे वदे नित्य वाचा”. इथं परत सदा हा शब्द आलाय.  सदा म्हणजे सतत.  रामनाम वदे म्हणजे ज्या भक्ताच्या मुखात राम नाम आहे. सतत, अव्याहतपणे ज्याच्या बोलण्यात रामनाम आहे, म्हणजे जो नामस्मरणाखेरीज दुसरं काही बोलत नाही.असा हा भक्त.

दुसरे कोणतेच विचार मनामध्ये आले नाहीत तर त्यामुळे मन शुद्ध होण्यास सुरुवात होते आणि वाणीही शुद्ध होते.  म्हणून असा हा सतत रामनाम जपणारा भक्त, धन्य होतो.

आता पुढचं एक लक्षण सांगताना समर्थ म्हणतात की, “स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा. म्हणजे जो भक्त स्वधर्माचे पालन करतो. तो खरा भक्त, म्हणजेच जो मनुष्य, संसारात राहून, संसार करता करता, आपल्या वाट्याला जे काम आलंय, ते स्वधर्म म्हणून स्वीकारून करतो, तोही भक्त धन्य आहे

भक्तांची लक्षणे सांगताना समर्थ या श्लोकात सांगितले आहे की, जे भक्त चंदनासारखा आपला देह सतत झिजवतात देवाकार्यासाठी ते भक्त धन्य होतात. यामध्ये हे सगळे संत ज्यांनी लोक उद्धारासाठी काम केलंय, अगदी ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, समर्थ रामदास, श्रीधर स्वामी, गोंदवलेकर महाराज, ते अगदी संत गाडगेबाबा, बाबा आमटे यासारखे कित्येक संत आपल्याला माहीत आहेत.  ते खरे भक्त.

तसंच ज्यांच्या मुखात सदैव रामनाम आहे आणि त्यामुळे मन निर्मळ होऊन ज्यांचे वाणी ही शुद्ध होते, ते खरे भक्त धन्य आहेत. आणि प्रपंचात राहून, जे प्रपंच करताना, मुखात परमेश्वराचे नाव घेत घेत, आपल्या वाट्याला आलेलं काम हे परमेश्वराने दिलेलं काम आहे, असं समजून ते पूर्ण करतात तेही भक्त धन्य होतात.

अशा भक्तांची वाटचाल ईश्वरप्राप्ती कडे नक्की होईल आणि परमेश्वर चरणी त्यांना नक्की जागा मिळेल, असं समर्थ सांगताहेत.  समर्थांना असा भक्त होणं अपेक्षित आहे.

जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.