Manobodh by Priya Shende Part 53 : सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 53 (Manobodh by Priya Shende Part 53)

सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी

न बोले कदा मिथ्या वाचा त्रिवाचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

परमेश्वराच्या लाडक्या भक्ताची अजून काही लक्षण, या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 53) समर्थांनी सांगितले आहेत. समर्थांना आपल्याकडून पण अशीच अपेक्षा आहे.

पहिल्या चरणात समर्थ म्हणतात, “सदा आर्जवी प्रिय जो सर्व लोकी”. आर्जवी किती छान शब्द आहे बघा. आर्जव करतो, विनंतीने बोलतो. मृदु, नम्र, प्रिय – कोणालाही आवडेल असं, मधुर वाणीने, असा ईश्वराचा लाडका भक्त बोलतो. तेही सर्वांशी. म्हणजेच सगळ्यांशी. सगळ्यांची मनं तो जिंकून घेतो, त्याच्या मृदू आणि मधुर वाणीने. नाहीतर आपण बघतो अवतीभवती किती कठोरपणे माणसं बोलतात. अत्यंत फटकळ ही माणसं असतात. तर काही स्पष्टवक्तेपणाच्या स्वभावामुळे कटू बोलून जातात. या सगळ्या मंडळींच्या बोलण्यामुळे माणसं दुखावतात, दूरावतात. तुमच्या आयुष्यातून निघून जातात. अशा बोलण्यामुळे दुसऱ्याला अपमानास्पद वाटतं. काही जण असे कठोर मुद्दाम बोलतात. तर काही जण अनावधानाने बोलतात. पण त्याचा परिणाम दुसऱ्याला दुःख होण्यातच होतो. आपण त्याला मग जाऊ दे, स्वभाव आहे असं म्हणतो, आणि स्वतः आपल्या जखमेवर मलम लावून घेतो. पण भक्त अत्यंत मृदू ,आर्जवी, मधुर, लाघवी असतात.

Young India ke Bol : प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस तर्फे ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धेचे आयोजन

पुढच्या चरणात समर्थ म्हणतात की, “सदा सर्वदा सत्यवादी विवेकी” सदासर्वदा म्हणजे नेहमीच, कायमच. आज केलं उद्या नाही, असं नाही. तर कायमच. तो भक्त कसा आहे तर सत्यवादी आणि विवेकी. असा माणूस नेहमी सत्य बोलतो. सत्य पण कुठे कसं बोलावं याचा सारासार विचार करत, म्हणजे विवेकाने बोलतो. कोणी रुग्णाला भेटायला गेलं तर माणसं त्या रुग्णालाच विचारतात की, असा कसा हार्ट अटॅक आला? म्हणजे नेमकं काय झालं तुम्हाला? हे असलं ऐकून, समोरचा अजून खजील होईल, असं बोलू नये. त्यापेक्षा त्याला धीर द्यावा डॉक्टर खूप चांगले आहेत लवकर बरे व्हाल. असा धीर द्यावा. विवेकाने बोलावं. असं म्हणणं सत्य नसलं तरी प्रसंग पाहून विवेकाने बोलावं. (Manobodh by Priya Shende Part 53)

समर्थ पुढचं लक्षणे सांगताना तिसऱ्या चरणात म्हणत आहेत की, “न बोले कदा मिथ्या वाचा त्रिवाचा”. ईश्वराचे लाडके भक्त कधीही व्यर्थ बडबड करत नाहीत. ती कमी बोलणारी असतात. अगदी जरुरीप्रमाणे बोलतील. ते पण सत्य बोलतात. मिथ्या बोलून आपला वेळ व्यर्थ दवडणार नाहीत.

उगीच बाष्कळ बडबड करत नाहीत. मिथ्या बोलत नाही. काही बोलायचं नसेल तर ते शांत बसतील. मौन धारण करतील. जे काही ते बोलतील, ते ठामपणे बोलतात. त्यामागे चिंतन असतं. काही विचार असतो. म्हणून ते तितकच ऐकलं पण जातं. व्यर्थ बडबड करणाऱ्या ला कोणी सिरियसली घेत नाही म्हणून समर्थ म्हणतात की धन्य दास मिथ्या बोलत नाही.

असा नम्र बोलणारा, मृदू बोलणारा, मधुर वाणी असलेला, कायम सत्य बोलणारा, तेही प्रसंगावधान राखून, विवेकाने बोलणारा, कधीही मिथ्य किंवा खोटं न बोलणारा भक्त, हा परमेश्वराचा लाडका भक्त असतो आणि जगात धन्य होतो.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.