Manobodh by Priya Shende Part 54 : सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी

एमपीसी न्यूज –  मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 54 (Manobodh by Priya Shende Part 54)

सदा सेवी आरण्य तारुण्यकाळी

मिळेना कदा कल्पनेचेनी मेळी

चळेना मनी निश्चयी दृढ त्याचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

भगवंताला प्रिय असलेल्या भक्तांच्या लक्षणांमध्ये पुढे या श्लोकात समर्थ म्हणताहेत, “सदा सेवी आरण्य तारुण्य काळी”. अरण्यात जाणे म्हणजेच इथे समर्थांना म्हणायचंय की, प्रपंचातून अलिप्त होऊन परमेश्वराची सेवा करणे. हे वृद्धापकाळात न करता तरुणपणापासून ह्याची सवय लागायला हवी. शरीरसुखाला संसारिक सुखाला फार महत्त्व न देता, परमेश्वराची भक्ती ही, तरुण असल्यापासून सुरू करा. देहाचे फाजील लाड, यांत्रिक सुखसोयी, यात न गुंतता, नैसर्गिक सुखाच्या मागे लागा. ज्यात मन शांती मिळेल. स्वार्थ नसेल. मनुष्य हा स्वार्थी असतो. त्याला फक्त मी आणि माझं कुटुंब सुखात हवं असतं. त्यासाठी त्याची खूप कष्ट करण्याची तयारी असते. पण त्यातून क्षणिक समाधान मिळतं. पण आत्मिक, पारमार्थिक समाधान, आनंद प्राप्त करायचा असेल तर, भजन, पूजन, कीर्तन, सत्संग, नामस्मरण अशी सगुणभक्ति ही, तरुणपणातच सुरू केली पाहिजे. संसारातून थोडा अलिप्तं राहून भक्तिमार्गाला, ह्या वयापासूनच लागला पाहिजे. परमार्थ ही फक्त म्हातारपणी करायची गोष्ट नाहीये तर, त्याची सवय, गोडी ही, तरूण असल्यापासूनच असायला हवी.

खऱ्या भक्ताला तरुण असल्यापासून भगवतभक्तीची ओढ निर्माण होते. भक्त प्रल्हाद, संत ज्ञानेश्वर अशी कितीतरी उदाहरणं आपण बघू शकतो.

Vegetable Sale at Grocery Shop : लवकरच रेशन दुकानात सुरू होणार फळे, भाजीपाला विक्री?

या पुढे दुसर्‍या चरणात समर्थ म्हणतात की, “मिळेना कदा कल्पनाचेनी मेळी”. म्हणजेच जे खरे फक्त आहेत, ते नुसत्या कल्पनाविलासात रमत नाहीत. ते सुख ही आभासी आहे. तात्पुरतं आहे. आपल्याला शेख चिल्ली ची गोष्ट माहीत असेलच. कर्म तर काही करायचं नाही, आणि उगीच स्वप्नांचे, कल्पनांचे इमले बांधत राहायचं. नुसती स्वप्नच बघायची. प्रत्यक्षात कृती काहीच नाही. त्यामुळे समर्थ भक्तांचे लक्षणे सांगताना हेच सांगत आहेत की, खरे भक्त हे कल्पनेच्या विश्वात दंग नसतात. संसारात मग्न नसतात. तर त्यांना भगवंताची आस लागलेली असते.

पुढचं लक्षणे सांगताना समर्थ म्हणताहेत की, “चळेना मनी निश्चयी दृढ त्याचा”. या भक्ताचा भगवतभक्ती प्रती निश्चय ठाम असतो. त्याच्यावर कसलेही संकट आलं तरी, त्यांचा निश्चय दृढ असतो. कसलाही प्रसंग येवो.. आनंदाचा, दुःखाचा, सुखाचा, सुख भोगण्याचा.. पण ते त्यांच्या निश्चयापासून तसूभरही ढळत नाहीत. त्यांची परमेश्वरावर श्रद्धा असते, दृढ विश्वास असतो. कोणत्याही मोहाला, तात्पुरत्या सुखाला, ते बळी पडत नाहीत आणि म्हणूनच असे भक्त परमेश्वराचे लाडके असतात आणि जगात धन्य होतात.

जे तरुण असल्यापासून संसारात अलिप्त होऊन भगवतभक्ती करतात, जे कल्पनाविश्वात रमत नाहीत, आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या भगवतभक्तीवर दृढनिश्चयाने मार्गक्रमण करत राहतात, असेच फक्त परमेश्वराचे लडके होतात.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.