Manobodh by Priya Shende Part 55 : नसे मानसी नष्ट आशा दुराशा

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 55 (Manobodh by Priya Shende Part 55)

नसे मानसी नष्ट आशा दुराशा

वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा

ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 55) भगवंताच्या लाडक्या भक्तांची अजून काही लक्षणं समर्थ सांगत आहेत. ते पहिल्या चरणात म्हणताहेत की,”नसे मानसी नष्ट आशा दुराशा”. म्हणजेच अशा भक्तांच्या मनातल्या आशा आणि दुराशा म्हणजे वाईट आशा दोन्ही पण पूर्णपणे नष्ट झालेल्या असतात. कोणत्याही चांगल्या वाईट गोष्टींची आशा मनात नसते. आशा किंवा दुराशा ही पण भविष्यातील असणारी एक प्रकारची स्वप्नच आहेत. हे भक्त फक्त भगवंतप्राप्तीच्या तळमळत मग्नं असतात. त्यांना तेवढीच एक आस लागलेली असते. भूतकाळ-भविष्यकाळ, सुख-दुःख सगळं भगवंताच्याच स्वाधीन करून ते भगवंत भक्तीत तल्लीन होतात.

पुढे दुसर्‍या चरणात ते म्हणतात की, “वसे अंतरी प्रेमपाशा पिपाशा”. या भक्तांच्या मनात फक्त प्रभूभेटीची अत्यंतिक तहान (पिपाशा) असते. पिपाशा- पिपासू- अंतरिक ओढ, जिज्ञासा. एखाद्या गोष्टीची अत्यंत तहान असणे. तर अशा भक्तांना भगवंत भेटीची, त्याच्या सहवासाची अत्यंतिक ओढ असते. ते सदानकदा भगवंत नामस्मरणातच रमलेले असतात. कोणतेही सुख दुःख ह्याने त्यांचे चित्त विचलित होत नाही. ते कायम भगवंत चरणी लीन झालेले असतात. त्यांच्या मदतीला भगवंत धावून येतात.

HSC Result 2022 : बारावीच्या परीक्षेत इंद्रायणी महाविद्यालयाच्या मुलींची बाजी

संसारी माणसाला ऐहिक सुखाची तहान असते. त्यामुळे ते खोट्या सुखाच्या मागे धावत असतात. जे खोटं सुख आहे, त्या जणू मृगजळामागे धावतात. त्यांना त्या मृगजळाचीच ओढ असते. तर खऱ्या भक्तांना परमेश्वराची ओढ असते. तो परमेश्वरच त्याचं सर्वस्व असतो. अशी माणसं ऐहिक सुखाला महत्व न देता, मोक्षाच्या मार्गाने जातात. त्यांच्यासाठी भगवंत प्राप्ती होणं, त्याच्या चरणाशी जागा मिळणं हेच जास्त महत्त्वाचं असतं. अंतकरणात फक्त भगवंत प्रेमाचीच तहान असते. त्यांनी परमेश्वराला आपल्या प्रेमबंधनात घट्ट बांधून ठेवलेलं असतं.

अशा भक्तांच्या महतीचं वर्णन करताना समर्थ म्हणताहेत (Manobodh by Priya Shende Part 55) की, त्यांची अर्पण भक्ती, सेवा करण्याची वृत्ती, फक्त परमेश्वराबद्दलची तळमळ म्हणजेच पिपाशा इतक्या पराकोटीची असते की, असे भक्त परमेश्वराचे ऋणी होण्या ऐवजी परमेश्वरच त्यांचा ऋणी होतो.

म्हणूनच समर्थ तिसऱ्या चरणात म्हणताहेत की,”ऋणी देवा हा भक्तिभावे जयाचा”. काय गंमत आहे बघा. भगवंताची भक्ती करता करता, तो स्वतःच भगवंत होतो. जिथे खरा भगवंत त्याचा ऋणी होतोय. त्यालाच देवत्व मिळतंय. मी तू पणाची झाली बोळवण, अशी अवस्था ती. म्हणूनच असे भक्त संत होतात. कारण शेवटी भगवंत हा दासाभिमानी आहे.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.