Manobodh by Priya Shende Part 57 : जगी होईजे धन्य या रामनामे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 57 (Manobodh by Priya Shende Part 57)

जगी होईजे धन्य या रामनामे

क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे

उदासीनता तत्त्वता सार आहे

सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे

(Manobodh by Priya Shende Part 57) ह्या श्लोकामध्ये माणसाने काय केलं, म्हणजे जीवनाचं सार्थक होईल ते सांगितलं आहे. सर्वसामान्यपणे आपलं शिक्षण, नोकरी, व्यवसाय मनासारखा असणे, त्यानंतर जोडीदार, अपत्य, पैसा, मानमरातब, बढती, पत, जमीन-जुमला, घर, वाहन, मुलांची शिक्षणं, त्यांची लग्न.. मुलाचा सुखी संसार, मुलगी दिल्या घरी आनंदात नांदतेय, नातवंडे.. पतवंडं बघणे, याला जीवनाचं सार्थक झालं, असं म्हणण्याची पद्धत आहे. पण हे सगळं प्रापंचिक, ऐहिक सुख आहे. त्याच्यासाठी माणसं खूप कष्ट करतात. आणि हे सगळं पाहिलं की स्वतःला धन्य झाल्याचं, समाधानी झालोत असं म्हणतात. समर्थ म्हणताहेत की, ह्यासोबत भक्ती केली पाहिजे. उपासना केली पाहिजे.

सुरुवातीच्या दोन चरणात ते म्हणत आहेत की, “जगी होईजे धन्य या रामनामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे”. खरंच जीवनाचं सार्थक कशात आहे, तर रामनामात आहे. भगवंत भक्तीत आहे. कारण माणसाचा अंतिम ध्येय हे मोक्ष प्राप्त करणे आहे. नुसता संसार करून, माणसाला अंतिम ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. कारण संसाराता मोह आहे. माया आहे, आणि जिथे मोह आहे, तिथे समाधान नाही. आसक्ती आहे. आसक्ती मुळे समाधान नाही. दिल मांगे मोर… आणि मग इच्छा आकांक्षा मनात राहिल्या की जन्ममरण परत परत चालूच राहतं. त्यातून सुटका नाही. म्हणूनच जिथे रामनाम आहे. तिथे समाधान आहे, आणि मुक्तीच्या दिशेने वाटचाल आहे.

जस आपण पाहिलं की भक्तीही तेवढीच आवश्यक आहे, जेवढा संसार केल्यावर त्या यशाने माणूस सुखावतो. तसाच भक्तीने पण परमानंद मिळतो. भगवंताने जे काही काम नेमून दिले आहे ते, न कंटाळता चोख पार पाडावं ते ही प्रामाणिकपणे. मग ते घरकाम असो.. बागकाम असो.. डॉक्टरचं असो.. इंजिनीयरचं असो.. की शिक्षकांचं असो. ते काम त्यांनी दिले असं समजून करावं. आपलं काम म्हणजे कर्म करताना, संसार करताना, त्या सोबत सतत परमेश्वराचे नाव घ्यावं. भक्ती करावी, नवविधा भक्ती करावी, सगुणभक्ति करावी. जे काही संसारातील सुख दुःख आहे ते परमेश्वराला देऊन आपण शांत मनाने भक्ती करावी. भक्ती बद्दल तर खूप काही कोण कोण सांगितलय.. बोललय.. पण त्यात अजून एक गोष्ट सांगितली आहे समर्थांनी, ती म्हणजे उपासनेची.

उपासनेच्या बाबतीत समर्थ खूप काही सांगतात. उपासना म्हणजे तरी काय? परमेश्वराला शरण जाणे. तेही अनन्यभावाने. एक नियम करून सतत आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेली अविरत साधना म्हणजेच उपासना. कोणी आपल्या शरीरासाठी व्यायाम करताे. कोणी चांगला अभ्यास करतो. कोणी संगीतासाठी रियाज करतो. कोणी खेळाडू होण्यासाठी सतत सराव करतो. तर भगवंत प्राप्ती साठी कोणी नामस्मरण करतो. अशाच या सरावाला, रियाझाला, व्यायामाला, नामस्मरण, भक्तीला उपासना म्हणू शकतो. उपासना केली तरच आपण आपल्या उद्दिष्ट पर्यंत पोहोचू शकतो.

यात मनापासून करणे आणि सातत्याने करणे हे, सार्थकता मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं. नाहीतर आज केलं, उद्या नाही.. त्याने काहीच साध्य होणार नाही. समर्थ स्वतःला श्रीरामाचे आणि हनुमंताचे भक्त होते. हनुमंताची उपासना त्यांनी लोकांना मारुतीची देवळे स्थापन करून सगळ्यांना सगुण भक्तीचा उपदेश केलाय. मार्ग दाखवलाय.

पुढे समर्थ म्हणत आहेत की,” उदासीनता तत्त्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे”. परत एकदा उदासीनता हा शब्द आलाय इथे दुःखीकष्टी, विषण्णं अवस्था.. असं नाही. तर तटस्थता असा अर्थ आहे. संसारात राहून त्यातली सुखदुःख साक्षीभावाने बघता येणं यालाच तटस्थता म्हणतात. सुखाचे हुरळून जायला होत नाही आणि दुःखाने होरपळून जात नाही, तर अशी ही तटस्थता येणं, हेच तर सर्व तत्वाचा सार आहे, असं समर्थ म्हणतात. आणि एकदा ही अवस्था आली की पुढे मोकळेपणा आला.

कसलाच भार खांद्यावर नाही. माणसा मधले षड्रिपु जर निघून गेले तर ही अवस्था येईल. एक साधं आपण, दुसऱ्याची ईर्ष्या करणं सोडलं तरी, बघा आपल्या खांद्यावरचा किती ओझं कमी होईल. षड्रिपू वर मात करून, आपलं कर्म सचोटीने करता करता प्रभू भक्ती केली, त्यांची उपासना केली, तर आपोआप माणूस मोकळा होईल. म्हणजेच स्वच्छंदी होईल.

ज्याच्या मनात कसलीच आसक्ती नाही की, किल्मीश नाहीत, इर्षा नाही, द्वेष नाही, क्रोध नाही आणि फक्त परमेश्वराची तळमळ आहे. तो माणूस निर्भयपणे स्वच्छंद जगतो. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याचं सार्थक होतं, असं समर्थ म्हणतात.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.