Manobodh by Priya Shende Part 58 : नको वासना विषयी वृत्तीरूपे

एमपीसी न्यूज – मनोबोध : मनाचे श्लोक क्रमांक 58 (Manobodh by Priya Shende Part 58)

नको वासना विषयी वृत्तीरूपे

पदार्थी पडे कामना पूर्वपापे

सदा राम निष्काम चिंतीत जावा

मना कल्पनालेश तोही नसावा

(Manobodh by Priya Shende Part 58) या श्लोकामध्ये भगवंताच्याच ठायी आपलं मन गुंतवावं, असं सांगितलं आहे. माणसाच्या मनामध्ये विषयाची आसक्ती असते. त्याची सहज प्रवृत्ती ही विषयाकडे, वासनेकडे आसक्त होणारी असते. यासाठी समर्थ सांगताहेत की, “नको वासना विषयी वृत्तीरुपे”. म्हणजे तुमच्या वृत्तीतच वासना आणि विषय विकार नकोत. म्हणजेच मुळातून या नष्ट केल्या पाहिजेत. एखादी छोटी इच्छा जरी मनात राहिली, तरी ती पूर्ण होण्यासाठी माणूस काहीही करायला तयार होतो. म्हणजेच एकदा का या इच्छापूर्तीचा ध्यास घेतला की, त्याचं मन दुसरा कसला विचार करतच नाही. मग अशा माणसांमध्ये परमेश्वराची ओढ लागेल कशी? मन वासनेतच गुंतले असेल तर भगवंतभक्ती होईल कशी? एक छोटीशी वासना, मन आणि शरीर पोखरून काढतं, म्हणूनच ही विषय वासना नकोच.

Bogus Caste Certificates : बोगस जातप्रमाणपत्र सादर करणाऱ्या दोन मजुरांची खातेनिहाय चौकशी, एकाची रोखली वेतनवाढ

यापुढे समर्थ म्हणताहेत की “पदार्थी पडे कामना पूर्वपापे”. पूर्व पापा मुळेच भाैतिक सुखाची ओढ लागते. त्यासाठी त्यांनी पदार्थ हा शब्द वापरला आहे. काम्यभावनेने केलेली पूजा ही व्यर्थ असते. अशी काम्यभावना, कोणती इच्छा, भौतिक सुखाची ओढ, ही माणसाला पूर्वपापानेच मिळते. आपण काम्यभावनेने केलेल्या कर्माच संचितात रूपांतर होतं. आणि चांगलं किंवा वाईट फळ मिळणारच असतं. हे फळ रुपी सुख दुःख भोगण्याकरता माणसाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो, आणि जन्म मिळाल्यावर पुन्हा मन भौतिक सुखाकडे धाव घेत, यालाच समर्थ पदार्थी पडे कामना पूर्वपापे असं म्हणतात.

मग यासाठी काय करायला हवं तर, “सदा राम निष्काम चिंतीत जावा”. निष्काम भावाने ना सतत रामनाम घ्या व त्याचं चिंतन करावं तरच परमेश्वर पावतो. भगवंताची सेवा निष्काम भावनेने करावी. ही भावना इतकी पराकोटीची हवी की तिला कल्पनेमध्ये सुद्धा थारा देऊ नये. “मना कल्पनालेश तोही नसावा”. म्हणजे या काम्यभावना प्रत्यक्षात तर नकोच, पण कल्पनेत पण नको. कारण त्या कल्पनेमध्ये जरी मन गुंतलं तरी, त्याचं रूपांतर त्या इच्छापूर्तीसाठी काहीही करायला तयार होतं. म्हणूनच ती भावना कल्पनेतून पण काढून टाका. तरच विषय वासनेतून मुक्ती मिळून परमेश्वराशी एकरूप होऊ असं समर्थ म्हणताहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.