Manobodh by Priya Shende Part 64 : अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 64 – Manobodh by Priya Shende Part 64

अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना
अति काम त्या राम चित्ती वसेना
अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा
अती विषयी सर्वदा दैन्यवाणा

एकदा का माणसांमध्ये विकार आले, तो विकारात अडकला की, त्याची अवस्था किती वाईट होते ते समर्थ या श्लोकात सांगताहेत.समर्थ पहिल्या चरणात म्हणताहेत की, “अति मूढ त्या दृढ बुद्धी असेना” अति मूढ म्हणजे अति मूर्ख. तर असा अति मूर्ख माणूस असेल, तर मग त्याचा दृढनिश्चय कधी होणार नाही. तो माणूस एकाच वेळेस अनेक विचार करून स्वतःची बुद्धीभेद करेल आणि रामनामापासून दूर राहिल.  त्याच्या अंतःकरणात रामा विषयी परमेश्वराविषयी तळमळ कशी दृढ राहणार? त्याच्या मनात परमेश्वर प्राप्तीचा निश्चय कसा राहणार? त्याचे चित्त जर एका ठिकाणी स्थिर नसेल.  मन चंचल असेल तर त्याला परमेश्वराच्या प्राप्तीसाठी, त्याच्या भेटीसाठी तळमळ राहणार नाही. त्याचं मन सर्वत्र फिरेल.  त्यामुळे परमेश्वराविषयी आस राहणार नाही.

Manobodh by Priya Shende Part 63 : घरी कामधेनू पुढे ताक मागे

पुढच्या चरणात समर्थ म्हणत (Manobodh by Priya Shende Part 64) आहेत कि,”अति काम त्या राम चित्ती वसेना”. ज्या माणसाच्या मनात केवळ कामवासना आहे. त्याच्या मनात परमेश्वराविषयी विचार येणार कुठून? कामातूर माणूस कामाशिवाय दुसरा विचारच करू शकत नाही. त्याच्या मनात फक्त कामवासनाच असते. अशा स्थितीत मन शुद्ध राहील कसं?  मन मोकळे राहील कसं? आणि मन मोकळं नसेल, तर भगवंताचे विचार मनात येतील कसे?

कामभावना ही नैसर्गिक आहे.  ती ईश्वराने निर्माण केली आहे. पण त्याचा अतिरेक करू नये.  प्रजोत्पादन आणि देह सुखासाठी माणूस कामभावना बाळगतो.  त्यात गैर नाही.  पण त्याचा अतिरेक टाळावा.  कामभावनेच्या आहारी जाऊ नये.  ती तुमच्या ताब्यात असायला हवी.  जसं स्वयंपाकात मीठ असतं.  त्याच्याशिवाय जेवण आळणी होतं.  मीठ हे जसं थोडासं का होईना स्वयंपाकात आवश्यक आहे. त्याप्रमाणेच अगदी जरुरी पुरतंच कामाचं स्थान असावं.  जसं मीठ जास्त झाल्यावर स्वयंपाक खारट होईल आणि खाण्यासारखा राहणार नाही.  तसंच कामाचं आहे.  त्याचा अतिरेक माणसाचं जीवन खराब करतो.  त्याचं आयुष्य वाया जातं.

तिसऱ्या चरणात समर्थ म्हणताहेत की अति लोभ त्या क्षोभ होईल जाणा.  अति लोभामुळे दुःखच वाट्याला येतं विषयात गुंतलेला माणूस हा कायम दैन्यवाणा भासतो.  विषय म्हणजे भौतिक सुख.  भौतिक सुखाची हाव कधी कमी होत नसते.  पैशाची हाव तर फार असते.   अशी माणसं परमेश्वराकडे पण पैशांची मागणी करतात.   समर्थ हेच सांगत आहेत ते अति लोभाने माणूस दैन्यवाणा होतो आणि विषयासक्त होतो.  त्याला परमेश्वराची भक्ती करावी हे डोक्यात येत नाही. भौतिक सुखालाच तो सुख मानत राहतो. जे की क्षणिक आहे.  याउलट खरे भक्त निसंःग पणाने परमेश्वराची आराधना करतात आणि चिरकाल आनंदी राहतात.

जय जय रघुवीर समर्थ
प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.