Manobodh by Priya Shende Part 7 : मनोबोध भाग 7 – मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक सात.

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे

मना बोलणे नीच सोशीत जावे

स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे

मना सर्व लोकांसि रे निववावे

संसारात काय किंवा परमार्थात काय, सतत आपल्या समोर चांगले वाईट प्रसंग हे येतचअसतात आणि त्या आलेल्या प्रसंगांसाठी आपण तयार असले पाहिजे.

त्याला धीराने तोंड देण्यासाठी अंगात धारिष्ट म्हणजे धैर्य किंवा धाडस असलं पाहिजे. त्यासाठी समर्थ श्रेष्ठ धारिष्ट असावं अस सांगत आहेत. कित्येकदा आपण बघतो की समोर येणार्‍या प्रसंगात माणूस हताश होतो बेचैन होतो आणि त्या अवस्थेत तो नीट विचार करू शकत नाही. चित्त थाऱ्यावर नसल्यामुळे माणूस सारासार बुद्धीने, त्याला तोंड देऊ शकत नाही. त्या माणसाचा आत्मविश्‍वास डळमळतो. माणूस खचून जातो, सैरभैर होतो आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ शकत नाही. त्यामुळे माणसाचे मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे, म्हणजे हे श्रेष्ठ धैर्य अंगात येईल.

पुढच्या चरणात समर्थ म्हणत आहेत की, मना बोलणे नीच सोशीत जावे. याचा अर्थ असा की कोणी काहीही बोललं तरी ते मनावर घेऊ नये. त्या नीच बोलण्याचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नये.

कोणी निंदा केली, तरी ती सोसण्याची तयारी पाहिजे. समोरचा निंदा करतोय, अपशब्द बोलतोय, शिव्याशाप देतोय म्हणून, माणसाने समोरच्यावर लगेच त्याच कृतीने वागू नये. त्याचप्रमाणे आपण नीच पातळीवर जाऊ नये.

असं म्हणतात की हत्ती त्याच्या मार्गावरून मार्गक्रमण करत असतो, तिथे गावोगाव त्याच्यावर कुत्री भुंकत राहतात, पण तो त्याचा मार्गक्रमण सोडत नाही आणि त्या भुंकण्याचा स्वतःवर परिणाम न होऊ देता, तो हत्ती शांतपणे, त्याच्या मार्गाने डाैलात जातो.

तसेच माणसाने कुणाच्या वाईट, नीच बोलण्याचा परिणाम करून घेऊ नये. आपला राग नियंत्रित ठेवावा. जेणेकरून पुढे ओढवणारे अनर्थ टळतील. माणसाने आपलं मन, निंदा किंवा स्तुतीने विचलित होऊ देऊ नका असं समर्थ सांगताहेत.

यापुढे जाऊन समर्थ म्हणत आहेत की, हे मना तू इतका सोशिक आणि शांत हो आणि तू सदैव नम्रपणे वाग. कोणी तुझ्याशी वाईट शब्दाने बोललं तर त्यांच्याशी पण तू नम्रपणानेच बोल.

नम्रपणा हा माणसाचा दागिना आहे. लोकांची वाणी कशीही असली तरी, आपण नम्रपणे बोलावं. आपला तोल कधीही ढळू देऊ नये. विद्या विनयेन् शोभते. विनय इतका महत्त्वाचा आहे.

अशा नम्र वागणूकीने लोकांना संतुष्ट आणि समाधानी कर. त्यांच्या समोर एक आदर्श ठेव, असं समर्थ सांगत आहेत.

कोणी अपशब्द वापरले, निंदानालस्ती केली, अपमान केला तर तो सोसावा, कारण त्याने काही आयुष्यात फरक पडत नसतो. हे असे प्रसंग सहन करण्यासाठी ज्येष्ठ धारिष्ट अंगात पाहिजे.

उच्च प्रतीचे धैर्य, सोशिकता, नम्रता अंगी बाणवून सर्वांनी समाधानी रहावं. सर्वांना आपलंसं करावं. माणसाचं मन शांत ठेवून, इतरांना शांत, समाधानी करावं म्हणजे, एक प्रगत समाज तयार होईल, असं समर्थांना अपेक्षित असावं.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे
मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.