Manobodh by Priya Shende Part 79 : मनोबोध भाग 79 – मना पावना भावना राघवाची

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 79 – Manobodh by Priya Shende Part 79

मना पावना भावना राघवाची
धरी अंतरी सोडी चिंता भवाची
भवाची जिवा मानवा भूलि ठेली
नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली

प्रापंचिक माणसाला आपला संसार हेच अंतिम सत्य आहे, असं वाटतं आणि त्यातच तो गुरफटून जातो, जो की भ्रम आहे.

पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणाच्या दोन शब्दांनी समर्थ म्हणताहेत की,”मना पावना भावना राघवाची धरी अंतरी”. समर्थ म्हणताहेत की, हे मना आपल्या अंतःकरणात शुद्ध भावना ठेव. मन पवित्र असू दे. ती केव्हा होईल, तर अहंकार सोडून दिला, मी पणा सोडून दिला, वाईट वृत्ती सोडून दिल्या, षड्रिपूंचा नायनाट केला तर होईल.   चित्त भक्तीभावाने ईश्वराच्या चरणी लीन केलं तर होईल.  सतत राघवाचे नामस्मरण केलं तर मन शुद्ध होईल.

” मनी प्रीती राघवाची धरावी”.  सारखं संसारात, प्रपंचात गुंतून त्याची चिंता करत बसू नये.  समर्थ म्हणताहेत भवाची म्हणजे या प्रपंचाची चिंता सोड.  माणसाला संसार नीटनेटका केला म्हणजे धन्य वाटतं. त्यासाठी येतो खूप कष्ट करतो.  खस्ता खातो.  पण प्रपंच उत्तम करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो.  उत्तम शिक्षण, नोकरी-व्यवसाय, त्यात बरकत, राहायला चांगले घर, गाडी, जमीन-जुमला, पत्नी, मूलबाळ, त्यांची शिक्षणं, त्यांचे संसार.. यातच त्याचं आयुष्य निघून जातं.  आणि एक वेळ अशी येते की, ह्यात खरं समाधान, आनंद प्राप्ति नाहीये हे त्याच्या लक्षात येतं.   पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो.   त्या ऐवजी त्या कामासोबतच राघवाची भक्ती केली असती, तर या संसाराच्या चिंता त्या परमेश्वरावर सोपवून, याला खरा आनंद प्राप्त झाला असता, हे समजतं.  पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते.

तेव्हा पश्चात्ताप करून (Manobodh by Priya Shende Part 79) काय उपयोग? म्हणूनच समर्थ म्हणतात की, सोडी चिंता भवाची. या संसाराची चिंता करायचं सोडून दे.भगवंताची भक्ती करावी.

“भवाची जिवा मानवा भूली ठेली, नसे वस्तूची धारणा वेर्थ गेली”. आपण फक्त संसार करायला आलो आहोत आणि तो यथाशक्ती पार पाडला म्हणजे आयुष्य आनंदात यशस्वीपणे पार पडलं. गाडी, बंगला, पैसा, जमीन-जुमला सगळं जमवलं म्हणजे, जन्माचं सार्थक झालं ही धारणाच चुकीची आहे.

याचा अर्थ तुम्ही खरी प्रगती केली, असं होत नाही.   पण जर त्यासोबत ईश्वर नामाची जोड मिळाली तर तुम्ही हळूहळू परमेश्वराच्या जवळ जाऊन हळूहळू मुक्तीच्या मार्गाला लागता.   खरा आनंद कशात आहे हे जाणता.   आनंदाच्या, परमानंदाचा अनुभवासाठी प्रयत्नशील राहता.  एकदा तुम्हाला हे कळलं की, मग वाटतं की उगीच सुखाच्या मागे धावत होतो.  मरण तर अटळ आहे. आणि काहीच कमावलेलं सोबत जाणार नाहीये.  फक्त ईश्वराच्या भक्तीने मिळालेलं पुण्यं, संस्कार हे पुढच्या जन्मात सोबत जाणार आणि ईश्वरचरणी प्रत्येक जन्मात हळूहळू जाऊन परमात्म्यात लीन होणार, ही खरी प्रगती होय.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.