Manobodh by Priya Shende Part 80 : मनोबोध भाग 80 – धरा श्रीधरा त्या हरा अंतराते

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 80 – Manobodh by Priya Shende Part 80

धरा श्रीधरा त्या हरा अंतराते |
तरा दुस्तरा त्या परा सागराते ||
सरा वीसरा त्या भरा दुर्भराते|
करा नीकरा त्या खरा मत्सराते ||

काव्याचा हा एक अति उच्च असा प्रकार आहे.  या श्लोकाची रचना बघितली तर दिसून येतं की र चा अनुप्रास प्रत्येक चरणात आहे आणि इतकंच नाही तर प्रत्येक चरणात दुसरं, पाचवं आणि आकारावं अक्षर तेच आहे.  हे एक दुर्मिळ काव्यं म्हणता येईल.

पहिल्या चरणात ते म्हणत आहेत की, “धरा श्रीधरा त्या हरा अंतराते, तरा दुस्तरा त्या परा सागराते”. साक्षात महादेवाच्या अंतरात वसणार्‍या परमेश्वराला हृदयात कायम ठेवावे. म्हणजेच ईश्वराची ध्यानीमनी चित्ती आराधना करावी. हे सगळं म्हणजेच प्रापंचिक धडपड विसरून मत्सरावर विजय मिळवून हृदयात भगवंत ठेवायचा.  एवढं केलं तरी, तरा दुस्तरा या परा सागरा ते, म्हणजेच संसाररुपी जो सागर आहे, जो की, पार करायला अवघड आहे, तो सागर पण, प्रापंचिक माणूस तरून जाईल.  असा विश्वास समर्थ देत आहेत. यासाठी प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात भगवंताला जागा द्यावी. त्याची मनापासून भक्ती करावी. म्हणजे हा भवसागर पार होईल.

Shivsrushti : केंद्रीय मंत्री अमित शहा शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे करणार लोकार्पण

पुढे ते म्हणताहेत (Manobodh by Priya Shende Part 80) की, सरा वीसरा त्या भरा दुर्भराते, करा नीकरा त्या खरा मत्सराते. समर्थ म्हणताहेत की पोट भरण्याचं काम जरा विसरा थोडावेळ. प्रत्येक माणसाला पोट भरण्याची चिंता असते. तो त्याच चिंतेत आयुष्यभर जगत असतो. आणि यासाठीच प्रापंचिक माणसाची अव्याहत धडपड चालू असते.   पण प्रत्यक्षात कोणाचं पोट भरल्याचं आढळून येत नाही. कारण ते जरा वेळ भरलं की पुन्हा रिकामं होतं.  म्हणून समर्थांनी दुर्भर हा शब्द वापरला आहे. दुर्भर म्हणजे न भरणारे. म्हणजे जे भरडा कठीण किंवा अशक्य आहे. हा अनुभव रोजच सगळ्यांना येत असतो. कितीही कमवा कमीच पडतं.  यात श्रीमंत लोक पण असतात. काय करणार? पोटासाठी करावं लागतं हेच ऐकतो आपण.  कारण त्या पोटाची भूक संपतच नाही. आपल्या शेजाऱ्याने, नातेवाईकाने, कार्यालयातील सहकारी मंडळींनी जरा काही वेगळं घेतलं की, मग आपल्याला पण घ्यावसं वाटतं आणि मत्सर माणसाला समाधानी होऊ देत नाही.  म्हणून मग ते पोट आपलं कधीच भरत नाही. म्हणूनच त्याला दुर्भर असं म्हटलं आहे.

तर अशा या न भरणाऱ्या पोटासाठी आहोरात्र धडपड चालू असते,  ती काही काळ विसरा, असं समर्थ सांगताहेत. “करा नीकरा त्या खरा मत्सराते”, म्हणजे ज्या मत्सरापायी हावेमुळे माणसाचे पोट भरत नाही, तो मत्सर सोडून द्या.  म्हणजे आपली खरी भूक किती आहे हे समजेल. आणि त्यासाठीच हृदयात हाव, मत्सर यांना जागा देण्यापेक्षा भगवंताला जागा द्या.  त्याच्या चरणाशी लीन व्हा. म्हणजे तुमचं नक्की समाधान आणि परमानंद कशात आहे हे कळेल.  संसार रुपी भवसागर पार होईल आणि प्रत्येक जन्मात थोडी प्रगती होईल.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.