Manobodh by Priya Shende Part 81 : मनोबोध भाग 81 – मना मत्सरे नाम सांडू नका हो

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 81

(Manobodh by Priya Shende Part 81)

मना मत्सरे नाम सांडू नका हो

अती आदरे हा निजध्यास राहो

समस्तांमध्ये नाम हे सार आहे

दुजी तुळणा तूळितां ही न साहे

ह्या श्लोकांमध्ये समर्थ नामाचा महिमा सांगत आहेत. ध्यानी,मनी, चित्ती रामनाम असावे, असं ते सांगत आहेत.

मनात मत्सर ठेवू नये. कोणाविषयी इर्षा बाळगू नये. प्रत्येकाला आपआपल्या कर्माने फळ मिळत असतं. दुसऱ्याकडे अमुक एक आहे आणि माझ्याकडे नाही..की त्या दुसऱ्या माणसाचा मत्सर वाटू लागतो. त्याच्याविषयी द्वेष वाढतो. आपण आपल्यासाठी प्रगतीचे मार्ग न शोधता, दुसऱ्याची अधोगती कशी होईल, अशी दुष्ट भावना वाढीला लागते. माणूस जीवे मारायला कमी करत नाही. इतक्या पराकोटीला हा मत्सर माणसाला घेऊन जातो. त्यामुळे मनामध्ये मत्सराला थारा देऊ नये. त्याऐवजी परमेश्वराला जागा द्या. अत्यंत आदराने त्या परमेश्वराचं नाम घ्या. त्याच्यावर प्रीती करत त्याची भक्ती करा त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करा. मनात षड्रीपूंना थारा देऊ नका.

म्हणूनच समर्थ (Manobodh by Priya Shende Part 81) म्हणतात की “मना मत्सरे नाम सांडू नका हो, अती आदरे हा निजध्यास राहो”. पुढे ते म्हणताहेत की, “समस्तांमध्ये नाम हे सार आहे, दुजी तुळणा तूळितां ही न साहे”.

सर्व साधनांचे सार हे नामस्मरण आहे. आज आपण साधनांचे प्रकार बघूयात. जसं की क्रिया- आधारित साधना. म्हणजेच पूजा,अर्चा, आरती, भजन, कीर्तन स्तोत्रपठण, व्रतवैकल्य इत्यादी.. ह्या सगळ्या साधना इंद्रियांच्या क्रियांशी निगडीत आहेत. आणि ह्या प्रकारची साधना पुन्हा पुन्हा करावी लागते.

काही साधना भाव- आधारित आहेत. ईश्वराविषयी श्रद्धा विश्वास प्रेम इत्यादी भाव असतात. हे मनातून अंतःकरणातून येतात पण हे भाव मनाची अवस्था असल्याने अनित्य अस्थिर असते. भाव सतत येत नाहीत. तर येतात जातात. मन सतत भावना अवस्थेत राहत नाही.

Indrayani News : इंद्रायणी प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट

काही साधना या बुद्धी – आधारित (Manobodh by Priya Shende Part 81) आहेत. ही साधना विवेकावर आधारित आहे यात नित्यानित्य वस्तू विवेक, वैराग्य, षट्संपत्ती(दम, शम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा, समाधान) आणि मुमुक्षुत्व येतं. या साधनेत इंद्रियांच्या क्रियांचा किंवा मनाच्या भावांचा आधार घ्यावा लागत नाही. ईश्वराची प्रतिमा नाम गुण रूप इत्यादींच्या स्मरणाचा आधार घ्यावा लागत नाही. ही साधना बुद्धीवर चालते. चित्तशुद्धीची आवश्यकता जाणून ज्ञानमार्गात थेट चित्तशुद्धीचे प्रयत्न केले जातात.

पण ह्या सगळ्या साधना आपली इंद्रिय क्रिया, मन आणि बुद्धीवर आधारित आहेत. आपली शारीरिक कुवत, मानसिक तयारी आणि बुद्धी ह्यावर अवलंबून आहे. पण या सर्वात सर्वांना करता येण्यासारखा सहज सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण होय. म्हणूनच समर्थ म्हणतात की, नाम साधनेची तुलना दुसऱ्या कोणत्याही साधने बरोबर होऊच शकत नाही. असं हे अमूल्य आणि अतुल्य नामस्मरण आहे. तेव्हा प्रत्येकाने नामस्मरणाचा मार्ग धरावा.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.