Manobodh by Priya Shende Part 83 : मनोबोध भाग 83 – जेणे जाळिला काम तो राम ध्यातो

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 83

जेणे जाळिला काम तो राम ध्यातो

उमेशी अति आदरे गुण जातो

बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे

परी अंतरी राम विश्वास तेथे

 

 

 

या श्लोकात पुन्हा एकदा भगवान शंकर यांचेच उदाहरण दिले आहे.

पहिल्या चरणांत ते म्हणताहेत की, “जेणे जाळिला काम तो राम ध्यातो”.  म्हणजेच कामवासनेवर सुद्धा ज्याची सत्ता चालते असे भगवान शंकर हे सुद्धा रामनाम घेतात.  कामादेवाने म्हणजेच मदनाने आपले कामभावानेचे अस्त्रं पार्वती मातेवर सोडलं होतं आणि तिचं चित्त विचलित केलं. हा उद्योग मदनाचा आहे हे शंकर देवाच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडून मदनाला भस्म केलं. हेच उदाहरण सांगून समर्थ म्हणत आहेत की ज्याने काम जाळला म्हणजेच कामवासनेवर विजय मिळवला, असे साक्षात भगवान शंकर सुद्धा रामाला भजतात.  एवढेच नाही तर ते पुढे म्हणतात की, “उमेसी अती आदरे गुण गातो”.  म्हणजेच ते नुसतं स्वतः रामनाम घेत नाहीत,  तर उमेला म्हणजे पार्वतीला सुद्धा रामनामाचे महत्त्व सांगून अत्यंत प्रेमाने, आदराने, भक्तीने रामनाम घेण्यास प्रवृत्त करतात.

पुढच्या दोन चरणांत समर्थ सांगताहेत की, “बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे,  परी अंतरी नाम विश्वास तेथे”.

ज्या व्यक्तींमध्ये प्रचंड ज्ञान वैराग्य भावना आणि सामर्थ्य असतं त्याच्या अंतःकरणात रामनामावरचा विश्वास असतोच असतो. असा त्रिगुणांचा समन्वय असणं हे तसं कठीण आहे.  पण ते रामनामाने शक्य होऊ शकतं.

म्हणजे याचाच अर्थ असा की, ज्याच्या अंतःकरणामध्ये रामनामावर दृढ श्रद्धा आहे त्याच व्यक्तीला ज्ञान, सामर्थ्य आणि वैराग्य प्राप्त होतं असं समर्थांना सांगायचय.

एखादा मनुष्य नुसताच सामर्थ्यवान आहे, ज्ञानी नाही, तर तो आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करेल आणि बाकीच्यांना त्रास देऊ शकेल.  त्याचा वापर तो फक्त ऐहिक सुखासाठी करून घेईल आणि दुसऱ्यांना त्रास झाला म्हणजे, सामर्थ्य हा गुण असून, दुर्गुण ठरू शकेल आणि अत्याचाराकडे त्याचा कल वाढेल.

पण एखादा मनुष्य सामर्थ्यवान पण आहे आणि ज्ञानीही आहे.. तर असा मनुष्य दुसऱ्याला त्रास देणार नाही, पण त्याच्या मनात ऐहिक सुखाची लालसा येऊ शकते. तो ऐहिक सुखातच अडकण्याची शक्यता आहे.  कोणाला त्रास न देता संपत्ती मिळवेन आणि वाटेल तशी खर्च पण करेन ह्यात अडकण्याचा धोका आहे.

परंतु एखादा मनुष्य ज्ञानी पण आहे, सामर्थ्यशील पण आहे आणि तरीही त्याच्यात वैराग्य भावना पण असेल, म्हणजेच त्रिगुण असेल तर त्याला कशाचीच आसक्ती उरणार नाही. तो सर्वांप्रती उदासीन असेल आणि भगवंतप्राप्तीचीच इच्छा बाळगेल.  असं वैराग्य फक्त रामनामामुळेच येऊ शकतं, तसा विश्वास त्याच्या अंतःकरणात असतो.  म्हणून अशी माणसंच वैराग्यशील होऊन आपला उद्धार करून घेतात, आणि हे केवळ रामा नावाच्या विश्वासामुळे शक्य होतं, हे समर्थ आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.