Manobodh by Priya Shende Part 86 : मनोबोध भाग 86 – भजा राम विश्राम योगेश्वराचा

एमपीसी न्यूज –  मनोबोध भाग 86 – मुखी राम विश्राम तेथेचि आहे – Manobodh by Priya Shende Part 86

मुखी राम विश्राम तेथेचि आहे

सदानंद आनंद सेऊनि राहे

तया वीण तो सीण संदेहकारी

निजधाम हे नाम शोकापहारी

मागच्या श्लोकातला ‘विश्राम’ हा शब्द ह्या ही श्लोकात आलाय. आपल्याला रोजच्या कामांमध्ये विश्रांतीची गरज भासते. आपली रात्रीची झोप ही पण विश्रांतीच आहे. आपली झोप पुरेशी झाली नाही, तर बघा दुसऱ्या दिवशीची काम बिघडायला सुरुवात होते. तर विश्रांती म्हणजेच विश्राम ही देहासाठी आणि मनासाठीची अत्यंत आवश्यक बाब आहे. विश्रांती पुरेशी घेतली की परत काही काळ आपण कार्यमग्नं राहू शकतो.

तर पहिल्या चरणांत समर्थ म्हणतात की, “मुखी राम विश्राम तेथेचि आहे”. चालता बोलता कामं करताना सुद्धा रामनाम घेता येतं, म्हणजेच हाताने काम करायचं, हृदयात रामाला स्थान द्यायचं, मुखाने हृदयाने रामनाम सतत चालू ठेवायचं. एकदा का या हृदयात राम वसला की तोच आपल्या देहाकडून काम करून घेतो. म्हणजे मग कसलाच त्रास राहत नाही. चालता बोलता रामनाम जप चालू असेल तर काम त्रासदायक वाटणारच नाही. आणि त्याचा शीणही जाणवणार नाही. कारण तोच जो आपल्या हृदयात वास्तव्य करतो, तोच आपल्याकडून सर्व काही करून घेतोय. मग शीण कसला. काम करतानाच तो विश्राम पण आहे. म्हणूनच जिथे राम आहे तिथे विश्राम आहे.

जेव्हा आपण आपल्याला आवडणारं काम करत असतो,तेव्हा त्याच्यात श्रम वाटत नाहीत. पण जे काम आपल्याला करायला आवडत नाही, ते करायचं म्हणलं की मोठे कष्टं वाटतात. जीवावर येतं ते काम करायचं. तर साधी गोष्ट आहे, हातात काम आणि मुखात राम ठेवा, म्हणजे कसलाच त्रास होणार नाही. तिथेही तुमची कामं सहजपणे, विनासायास होऊन जातील. त्यातही तुम्हाला विश्रांती वाटेल. कारण ते करून घेणारा साक्षात राम (Manobodh by Priya Shende Part 86) आहे.

तुमच्या आवडीचं नावडीचं कसलंही काम असलं तर ते सहज होईल. तिथे श्रम वाटणार नाहीत. कारण काम करून घेणारा राम असेल आणि तुमच्या मुखात, चित्तात रामनाम असेल. त्यात तुम्हाला आनंद वाटेल, त्यामुळे पुढे ते म्हणत आहेत की, “सदानंद आनंद सेऊनी राहे”. सदा म्हणजे सतत.. अविरत. आनंद म्हणजे आनंद.. सेऊनी राहे म्हणजे तुम्ही जर सतत रामनाम घेत आपलं कार्य पार पाडत आहात, त्या कामाचा शीण न येता.. त्याची कटकट न वाटता.. तुम्हाला त्यात आनंदच वाटेल. तुम्ही सतत मिळणाऱ्या आनंदाचे, सदानंदाचे स्वरूपानंदाचे धनी व्हाल. हा आनंद क्षणिक नाहीये. भौतिक सुख मिळालं.. थोडं यश मिळालं.. कोणाच्या सानिध्यात आले.. निसर्गरम्य वातावरणात जाऊन आलोत.. नोकरीत बढती मिळाली.. म्हणजे जो आनंद मिळतो तो क्षणिक असतो.. तो आत्ता आहे, आज आहे तर, उद्या त्याची जाणीव नसेल. तर सदानंद म्हणजे सतत मिळणारा आनंद, हा क्षणिक नसून शेवटच्या क्षणांसोबत फक्त आनंदच असेल. फक्त आनंदाचे मानकरी तुम्ही असाल, त्याचे धनी व्हाल म्हणजेच सदानंद आनंद सेऊनी राहे.

आणि तो जर नसेल तर समर्थ म्हणताहेत की, “तया वीण तो सीण संदेहकारी”. म्हणजेच राम नाम तुमच्या मुखी नसेल, रामाचं वास्तव्य तुमच्या हृदयी नसेल, तो भाव.. श्रद्धा जर का तुमच्या हृदयी नसेल, तर प्रत्येक सुखकर कृतीचा पण शीण वाटेल. छोटी गोष्ट पण कटकटीची वाटेल आणि त्यातूनच संदेह निर्माण होईल. संशय निर्माण होईल की, या रामनामात खरंच काही तथ्य आहे का? आणि एकदा संशयाचं भूत शिरलं की ते वाईटचीच कल्पना करतं आणि तसेच घडत जातात. त्यामुळे रामनाम नसेल, त्यात विश्राम वाटत नसेल, तर उठल्यापासून प्रत्येक गोष्टीचा कंटाळा येईल. कटकट वाटेल आणि त्यामुळे शेवटी दूषण आपण देवाला देऊ. इतकं रामनाम केलं, पण भौतिक सुद्धा नाही मिळालं. तर रामनाम घेता कशासाठी? यावर अवलंबून आहे. तुम्हाला रामाच्या चरणी जायचय म्हणून, की काही भौतिक, क्षणिक सुख मिळावे म्हणून? हे आधी कळलं पाहिजे. जिथे भाव तिथे देव. कसल्याही अपेक्षेने रामचिंतन करू नये. तो फळ देणारच आहे. पण त्या तुमच्या मनातल्या फळासाठी भक्ती केली, तर ती योग्य नाही. रामाशी एकरूप होणे, हे एकच ध्येय असावं आणि त्यात कसलाही संदेह नको, तर भवसागर पार होईलच.

पण जर तेच नाम भावपूर्वक घेतलं तर समर्थ सांगताहेत की,”निजधाम हे नाम शोकापहारी”.निजधाम म्हणजे स्वरूप, सच्चिदानंद स्वरूप, हे मिळतं. नुसत्या नामाने शोक हरतात. दुःख निवारण होतं. राम नाम जपाने या जीवाला सच्चिदानंद स्वरूप मिळतं सुखदुःख एकाच पातळीवर राहून तुम्हाला खरा आनंद प्राप्त होतो. एकदा का माणूस रामनामात गुंतला म्हणजे आपोआपच त्याचं मन स्थिर होईल. त्याच्या चित्ताला स्वस्थता लाभेल आणि त्याला आनंदची प्राप्ती होईल. मग सहाजिकच रोजच्या प्रपंचातील चिंता शोक माणसाच्या ठायी राहणार नाही. त्याचं मन निर्मळ होईल. मी विषयाचा नाही. भगवंताचा आहे. असं मनाला सांगणे आणि मनात अशी जाणीव उत्पन्न करणे यासाठी नाम घ्यावं. असं समर्थ सांगताहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

PCMC: दहावीच्या परीक्षेत एकही कॉपीचे प्रकरण नाही

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.